PATH PRADIP

 

दुसरी आवृत्ति : १९९७

 

किंमत: रु. १५.००

 

ISBN 81-7058-478-7

 

© श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, पाँडिचेरी - २   १९९७

प्रकाशक : पुस्तक-प्रकाशन विभाग, श्रीअरविंद आश्रम

पाँडिचेरी - ६०५००२

मुद्रक : श्रीअरविंद आश्रम प्रेस, पाँडिचेरी - ६०५००२

 

I


अनुक्रमणिका

 

उतारा क्र.

विषय

निवड

पृष्ठ क्र.

०१

ईश्वरमय आंतर जीवन

नलिनीकांत

०१

०२

अहंकारांतून मुक्ति आवश्यक

चिन्मयी

०२

०३

व्यक्तीचें ईश्वराशीं ऐक्य

श्रीमाताजी

०३

०४

श्रद्धेचें माहात्म्य

दोरास्वामी

०४

०५

पुरुषोत्तम - स्वरूप

दारा

०६

०६

मानवी जीवनाचें उद्दिष्ट - ईशप्राप्ति    

द्युमान्

०७

०७

पूर्ण परिपूर्तीचा मार्ग

दत्ता

०८

०८

परमेश्वर संपूर्ण समर्पण अपेक्षितो

अमल किरण

१०

०९

तूं पूर्ण शरण आलास तर मी काय करीन ?

द्युमान्

१२

१०

भक्त हा ईश्वराचें कार्यसाधन आहे 

चंदूलाल

१४

११

ईश्वररूपी मालकास जाणून घे  

श्रीमाताजी

१५

१२

भक्ताची माता - ईश्वर 

अमृता

१५

१३

परमेश्वरासाठीं पूर्ण-कर्म करण्याची जरुरी 

पवित्र

१६

१४

ईशप्रेरित कार्यावर लक्ष केंद्रित कर 

सत्येन्

१७

१५

यज्ञ-बुद्धीनें कर्मसमर्पण केल्याचें फळ 

ताजदार

१८

१६

पुरुषोत्तमाशी एकरूप होण्यासाठीं -- 

पुरुषोत्तम

१८

१७

आध्यात्मिक पूर्णत्व व समानत्व 

चंपकलाल

२०

१८

आत्मसमर्पिताला ईश्वराचें आश्वासन  

अनिलवरण

२०

१९

परिपूर्ण ईश्वर-शरणता

राजङ्गम्

२२

२०

पूर्ण शांतींतच आत्मसाक्षात्कार    

नलिनीकांत

२३

२१

तुमच्या पूर्णतेचें स्वरूप 

चिन्मयी

२३

२२

श्रद्धाच आम्हांला सामर्थ्य देते  

राजङ्गम्

२४

 

II


          

उतारा क्र.

विषय

निवड

पृष्ठ क्र.

२३

पूर्ण आध्यात्मिकतेचें संपादन

द्युमान्

२५

२४

दिव्यतासंपन्न जाणीव काय अनुभवते ?

ताजदार

२५

२५

खरें ज्ञान व त्याचें फळ

अमल किरण

२६

२६

मन म्हणजे केवळ शांत वाहक बनावें

पवित्र

२७

२७

ज्ञानाच्या अधिष्ठानावर जीवन उभारा

ललिता

२८

२८

अंतिम साक्षात्कारानें काय होईल ?

दारा

२९

२९

अवतार दिव्य व्यक्तिरूपांत कां येतो ?

अमृता

३०

३०

मानवाचीच विशेष निवड

पुरुषोत्तम

३१

३१

पूर्ण आत्मसमर्पणाची निकड

दत्ता

३२

३२

ज्ञानास मूल्य केव्हां येतें ?

श्रीमाताजी

३२

३३

अहंचा प्रभूच्या ठिकाणीं विलय

अमल किरण

३३

३४

साधकानें धीरोदात्त असावें

दत्ता

३४

३५

अभीप्सेचा अग्नि

नलिनीकांत

३५

३६

वासनेचा त्याग - पहिली गरज

श्रीमाताजी

३६

३७

तमोगुणापासून धोका

दत्ता

३८

३८

ज्यांना समर्पण साधलें --

श्रीमाताजी

३९

३९

वस्तुमात्राचें सत्य कोठें असतें ?

चिन्मयी

३९

४०

अहंकारत्याग व त्याचें फळ

अमल किरण

४०

४१

समत्व-संपादनाचा त्रिविध कार्यक्रम

दारा

४२

४२

कोणतीहि कला मुक्तिप्रद असावी

श्रीमाताजी

४३

४३

समाधीची खरी कसोटी

सत्येन्

४३

४४

मनुष्य पूर्ण व्हावयाचा तर --

पुरुषोत्तम

४४

४५

ब्रह्म व त्याचें आवरण

पुरुषोत्तम

४५

४६

अतिमानवतेचा दिव्य मार्ग

सत्येन्

४५

४७

ईश्वरभक्ताला सर्वकांहीं मिळतें

नलिनीकांत

४६

४८

त्यागाचें स्वरूप

ललिता

४६

 

III


 

उतारा क्र.

विषय

निवड

पृष्ठ क्र.

४९

काल व आदर्श वृत्ति

श्रीमाताजी

४७

५०

तुमचीं कर्में विरून जातील

पवित्र

४७

५१

प्रकृतीच्या खेळाचें कारण

श्रीमाताजी

४७

५२

अध्यात्म-तत्त्व जीवनांत आणणें

अमृता

४८

५३

प्रकृतींत आध्यात्मिक परिवर्तन हें ध्येय

चंपकलाल

४९

५४

अशा स्थानीं आत्मज्ञान लाभतें --

नलिनीकांत

५०

५५

मुक्त मानव कसा असतो ?

नलिनीकांत

५०

५६

हा मार्ग सोपा व खात्रीचा आहे

अमृता

५१

५७

भक्तियोगांतील ध्यानाची विशेषता

अमृता

५१

५८

सर्वांगपरिपूर्ण आत्मदान हवें

अमल किरण

५२

५९

शुद्धीकरण सर्वांगीण हवें

अमृता

५२

६०

ईश्वरी प्रसादाचा परिणाम

नलिनबिहारी

५३

६१

ईश्वराशीं एकरूप होण्यासाठीं --

चंपकलाल

५४

६२

तर्क नको, अनुभव हवा

दत्ता

५४

६३

अनिर्वाच्य ब्रह्माचें स्वरूप

दत्ता

५४

६४

योगाचा खरा आशय

दत्ता

५५

६५

स्वयंसिद्ध आनंद

दत्ता

५५

 

IV


 

पथ-प्रदीप

 

(१९३१ सालीं १८ मार्चपासून २ मे पर्यंत रोज सायंकाळीं श्रीमाताजी आणि कांहीं साधक एकत्र जमत असत. त्यावेळीं कधीं कधीं श्रीअरविंदांच्या लिखाणांतील निवडलेल्या उताऱ्यांचें वाचन होई. रोज एक-दोन साधक मन एकाग्र करून, पुस्तकाच्या एकाद्या पानामध्यें बोट किंवा कागद कापण्याचा चाकू सरकवून तें पान उघडत आणि त्यांतील एका उताऱ्याकडे निर्देश करीत. श्रीमाताजी सुद्धां त्यांत भाग घेत असत अशा प्रकारें उत्स्फूर्तपणें निवडलेले कांहीं उतारे खालीं देत आहोंत त्यामुळें साधकांच्या आंतरिक विकासाला साह्य आणि मार्गदर्शन होईल. या उताऱ्यांचीं शीर्षकें संपादकांनीं दिलीं आहेत.)

 

१. ईश्वरमय आंतर जीवन

आमच्या आंत आमच्या प्रियकराची मूर्ति आमच्या अंतर्दृष्टीला दिसली पाहिजे. आम्ही या प्रियकराचा राजवाडा बनलें पाहिजे. या राजवाड्यांत राहून आमच्या प्रियकरानें आमच्या हृदयांत आपल्या स्वरूपाचें माधुर्य भरलें आहे, आमच्या मनाच्या व जीवनाच्या सर्व व्यवहारावर, तो आमचा मित्र, मालक, प्रियकर म्हणून, आमच्या अस्तित्वाच्या शिखरावरून नजर ठेवीत आहे, तेथूनच आमचें त्याच्या विश्वव्यापक रूपाशीं ऐक्य घडवून आणीत आहे, हें सर्व आमच्या अंतर्दृष्टीला दिसलें पाहिजे. आमच्या आंत आम्ही ईश्वराशीं नेहमीं सलगीचें नातें ठेवलें पाहिजे. या सलगीचा आनंद आमच्या ठिकाणीं अखंड टिकला पाहिजे. आमचे नेहमींचे व्यवसाय दूर ठेवून आम्ही सर्वथा आमच्या अंतरंगांत शिरून ईश्वराच्या विशेष जवळ जातो व त्याची भक्तिभावानें पूजा करतो, सेवा करतो; अशा प्रकारची, आपले

पान क्र. १


 

नित्याचे व्यवसाय टाकून केलेली, आपल्या मानवोचित व्यवहारांना सोडून देऊन केलेली, अशी ही सलगी असतां कामां नये. आमचे सर्व विचार, ऊर्मी, भावना व कृति आम्हीं नेहमीं ईश्वरापुढें अगोदर त्याच्या मताकरितां ठेवल्या पाहिजेत, तो त्यांना संमति देईल किंवा त्या नापसंत करील; त्याच्या मतानुसार आम्हीं वागलें पाहिजे. आमची इतकी तयारी झाली नसेल, तर आमचे विचार, भावना, ऊर्मी व कृति आम्हीं अभीप्सेच्या, उच्च आकांक्षेच्या यज्ञांतील आहुति म्हणून अर्पण कराव्या; असें केलें तर ईश्वर आमच्या आंत अधिकाधिक प्रविष्ट होईल, आमच्या विचारांत वगैरे आपली अधिकाधिक उपस्थिति ठेवील, आपली इच्छाशक्ति आणि सामर्थ्य, आपला प्रकाश आणि ज्ञान, आपलें प्रेम आणि आनंद त्यांत अधिकाधिक भरत जाईल. असें होतां होतां शेवटीं, आमचे सर्व विचार, ऊर्मी, भावना व कृति ईश्वरापासून निघूं लागतील;  त्यांना आपोआप दिव्य आकार येऊं लागेल, दिव्य बीजांचें रूप येऊं लागेल, आमचें आंतर जीवन ईश्वरमय होऊं लागेल; ईश्वराच्या अस्तित्वाचा एक भाग आमचें अस्तित्व आहे अशी जाणीव आम्हांला आमच्या आंतर जीवनांत होऊं लागेल आणि शेवटीं आमचा पूजाविषय ईश्वर आणि आमचें जीवन, यांच्यांत मुळींच विभक्तपणा रहाणार नाहीं.

-- यो. स. भा. ३ प्र. ८ - निवड : नलिनीकांत. १८ मार्च

 

२. अहंकारांतून मुक्ति आवश्यक

अहंकार आणि व्यक्तिगत मत यांतून बाहेर पडावें आणि आत्म्याच्या व ब्रह्माच्या व्यापक दृष्टीनें सर्व वस्तुजाताकडे बघावें; ईश्वराला त्याच्या समग्र सत्यासह आणि सर्व रूपांसह जाणून घेऊन, त्याची भक्ति करावी; प्रकृतीच्या आणि अस्तित्वाच्या सर्वातीत आत्म्याच्या हातीं स्वतःला सर्व प्रकारें सोंपवावें, ईश्वरी जाणीव आत्मसात् करावी आणि त्या जाणिवेच्या

पान क्र. २


 

हातीं स्वतःला देऊन टाकावें; विश्वव्यापक प्रेम, आनंद, इच्छा, ज्ञान या बाबतींत एकमेव पुरुषोत्तमाशीं एकरूप व्हावें; त्याचे ठिकाणीं राहून सर्व भूतांशीं एकरूप व्हावें. विश्वांतील सर्व कांहीं परमेश्वरच झाला आहे या जाणिवेच्या दिव्य पायावर सुप्रतिष्ठित होऊन मुक्तात्म्याच्या दिव्य अवस्थेंत आम्हीं आपलें कर्म ईश्वराची पूजा, ईश्वरासाठीं यज्ञ म्हणून करावें -- हें गीतेच्या योगाचें सार आहे. हा योग म्हणजे आमच्या अस्तित्वाच्या दर्शनी स्वरूपांतून निघून त्याचें खरें, श्रेष्ठ आध्यात्मिक स्वरूप प्राप्त करून घेणें आहे; आणि हें संक्रमण व्हावयासाठीं विभक्त जाणिवेच्या अनेक मर्यादा आम्हांला पार कराव्या लागतात; आमचें मन विकारासक्त असतें, अस्वस्थ, अज्ञानी असतें, त्याचा प्रकाश आणि ज्ञान संकुचित असतें, तें पापपुण्य घोकीत असतें, कनिष्ठ प्रकृतीचा द्वंद्वाचा धर्म हा त्याचा धर्म असतो -- या सर्व गोष्टीविषयींची मनाची आसक्ति पार करून आम्हांला पलीकडे जातां येईल तेव्हांच हें उपरिनिर्दिष्ट संक्रमण शक्य होतें आणि म्हणूनच भगवान् गुरु म्हणतात, ''अर्जुना, तूं मत्परायण हो, तुझीं सर्व कर्में मनापासून मला अर्पण कर, बुद्धियोगाचा, बुद्धिधृतियोगाचा आश्रय करून हृदयानें आणि जाणिवेनें नित्य मजजवळ रहा. तूं असा नित्य वागशील, तर माझ्या अनुग्रहानें तुला सर्व अडचणींतून पार होतां येईल.''

-- गी. नि. खं. २ भा. २ प्र. २२ - निवड : चिन्मयी. १९ मार्च

 

३. व्यक्तीचें ईश्वराशीं ऐक्य

व्यक्तीच्या अस्तित्वाचें ईश्वराच्या स्वभावाशीं परिपूर्ण ऐक्य होणें ही पूर्ण आध्यात्मिक जीवनाची अनिवार्य पार्श्वभूमि आहे. म्हणून सर्वभावानें ईश्वराकडे वळा. तुमची सर्व प्रकृति ही ज्ञान, भक्ति व कर्म यांच्या आश्रयानें ईश्वराशीं एकरूप करा. सर्वथा त्याला शरण जा आणि तुमचें

पान क्र. ३


 

मन, तुमचें हृदय, तुमची संकल्पशक्ति, तुमची सर्व जाणीव, तुमची इंद्रियें आणि तुमचें शरीर देखील त्याच्या हातांत द्या, कांहींहि शंकाकुशंका न घेतां त्याच्या हातांत द्या. तो आपल्या दिव्य जाणिवेच्या निर्दोष सांच्यांत तुमची जाणीव घालून तिला सार्वभौमत्व, सर्वाधिपत्य बहाल करील, तें त्याला करूं द्या. तुमचें हृदय हें ईश्वराचें प्रसन्न वा तेजोमय हृदय होऊं द्या. तुमचा संकल्प, त्याच्या संकल्पाचें निर्दोष कार्य होऊं द्या. तुमची इंद्रियसंवेदना आणि शरीर देखील त्याच्या आनंदमय संवेदनेनें भरलेल्या शरीराशीं एकरूप होऊं द्या. जें कांहीं तुम्ही असाल, तें सर्व, त्याचें पूजाद्रव्य करा, त्याच्या यज्ञांतील हविर्भाग करा. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक प्रेरणा, प्रत्येक कर्म त्याच्या स्मृतीनें पवित्र करा. वरील सर्व गोष्टी सर्वथा ईश्वराच्या होईपर्यंत, हें सर्व चिकाटीनें करीत रहा. तुमच्या आत्म्याच्या पवित्र आंतरतम मंदिरांत ईश्वर जसा राहत आहे तसा तो तुमच्या अगदीं सामान्य बाह्य अंगांत आणि सामान्य बाह्य वस्तूंत, आपल्या नित्य परिवर्तनकारी स्वरूपानें राहूं लागेपर्यंत, राहूं लागलेला तुम्हांला अनुभवास येईपर्यंत तुम्ही चिकाटीनें वर सांगितलेल्या गोष्टी करीत रहा.

-- गी. नि. खं. २ भा. २ प्र. २४ - निवड : श्रीमाताजी, १९ मार्च

 

४. श्रद्धेचें माहात्म्य

आमच्या श्रद्धेच्या पाठीमागें नेहमींच ईश्वरी शक्तीवरची श्रद्धा असणें आवश्यक आहे; आणि ही शक्ति व्यक्त झाल्यावर ही श्रद्धा पूर्ण व्हावी, निःसंशय सर्वांगीण व्हावी. या शक्तीला अशक्य असें कांहींहि नाहीं. ही शक्ति ज्ञानसंपन्न विश्वदेवता, सनातन सर्वनिर्माणकर्ती, परमात्म्याच्या सर्वसमर्थतेनें संपन्न अशी आहे. सर्व ज्ञान, सर्व प्रकारचीं सामर्थ्यें, सर्व प्रकारचे विजय, सर्व प्रकारचें कौशल्य आणि कर्म या शक्तीच्या हातीं

पान क्र. ४


 

आहे. आत्म्याचे खजिने, सर्व सिद्धि आणि पूर्णता तिच्या हातीं आहेत. ती महेश्वरी आहे, सर्वश्रेष्ठ ज्ञानाची देवता आहे. सत्याचे सर्व प्रकार, सर्व विस्तार पाहूं शकणारी तिची दृष्टि ती आम्हांला देते; आध्यात्मिक इच्छेची तिची प्रामाणिकता, तिच्या अतिमानसिक व्यापकतेची शांति व तळमळ, तिच्या ज्ञानाचा आनंद ती आम्हांला देते; ती महाकाली आहे. सर्वश्रेष्ठ सामर्थ्याची देवता आहे. सर्व प्रकारचें सामर्थ्य, आध्यात्मिक सामर्थ्य, कठोरतम तपाचें सामर्थ्य तिच्या ठिकाणीं आहे. संग्रामांत यश देणारा वेग तिच्या ठिकाणीं आहे. पराभव, मरण आणि अज्ञान यांच्या फौजा यांना कःपदार्थ करणारें अट्टहास्य तिच्या ठिकाणीं आहे. ती महालक्ष्मी आहे. सर्वश्रेष्ठ प्रेम व आनंद यांची देवता ती आहे. आत्म्याची कृपा, मोहक व सुंदर आनंद, संरक्षण, प्रत्येक मानवी व दिव्य वरदान, या देणग्या या देवतेकडून प्राप्त होऊं शकतात. ती महासरस्वती आहे. ती दिव्य कौशल्याची आणि आत्म्याच्या कर्मांची देवता आहे. योग: कर्मसु कौशलम् ! कर्मकुशलता हा तिचा योग आहे. दिव्य ज्ञानाचा उपयोग, आत्म्यानें जीवनांत रस घेऊन काम करणें, जीवनांतील सुखद सुसंवाद हें महासरस्वतीचें कर्तृत्व आहे. ईश्वरी शक्ति ही अशी आहे. ती आपल्या सर्व रूपांत, सर्व शक्तींत ही जाणीव प्राधान्यानें ठेवते कीं, 'महेश्वरीच्या' शक्ती तिच्या आहेत; तिच्या ठिकाणीं, साधनभूत अस्तित्वाला कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यांना उपयोगी पडणारी दिव्य वेगवान् क्षमता आहे. तिच्या ठिकाणीं एकता आहे. सर्व भूतांतील सर्व सामर्थ्यांशीं एकता, अभिन्नता तिच्या ठिकाणीं आहे. सर्व भूतांशीं सहकार्याची सहानुभूति तिच्या ठिकाणीं आहे, सर्व भूतांशीं ती तादात्म्य पावूं शकते. या कारणांनीं, विश्वांत कार्यान्वित होणाऱ्या सर्व प्रकारच्या ईश्वरी इच्छेशीं तिची इच्छा जुळते आणि हें संवादित्व सहजच अनेकविध सुफलांना प्रसवतें. या शक्तीवरच्या श्रद्धेचें अंतिम पूर्णत्व आमच्या ठिकाणीं स्थापित झालें म्हणजे, हिची मूर्ति आणि हिच्या शक्ती आमच्या

पान क्र. ५


 

अंतरात्म्याला अगदीं जवळच्या, जिव्हाळ्याच्या नात्यांतल्या वाटतात; आणि आमच्या अस्तित्वाच्या ठिकाणीं व त्याच्या परिसरांत जें जें कार्य ही शक्ति करते त्या त्या कार्याला आमचें सर्व अस्तित्व मोठ्या समाधानानें आपली स्वतःची अनुमति देतें.

यो.स. भा.४ प्र.८ -- निवड : दोरास्वामी. २० मार्च

 

५ पुरुषोत्तम-स्वरूप

एकमेव पुरुषोत्तम नित्य अनेक होत असतो; अनेक जीव आणि अजीव हे, वरवर विभक्त दिसत असले, तरी ते नित्य एक असतात. पुरुषोत्तम एक आहे, पण एकतेनें बांधलेला नाहीं. तो अनेक होतो, पण अनेक होत असून तो विखुरला जात नाहीं -- अस्तित्वाचें हें सर्व रहस्य तो आमच्या ठिकाणीं उलगडून दाखवतो. पूर्ण सर्वांगीण ज्ञान म्हणजे, हें ज्ञान होय. सर्व अनुभवांचा मेळ घालणारी अनुभूति म्हणजेच ही अनुभूति होय. या ज्ञानामुळें, या अनुभूतीमुळें, 'मुक्त कर्म' करण्याची पात्रता मुक्त मानवाला प्राप्त होते.

हें ज्ञान पराभक्तीनें प्राप्त होतें असें गीता सांगते. अतिमानसिक आणि उच्च आध्यात्मिक वस्तु-दर्शन घडून मन जेव्हां आपलें मनपण टाकून अतिमानस बनतें, जेव्हां त्याबरोबर हृदयहि वर चढतें, आणि प्रेमाची व भक्तीची आपली अज्ञानी मानसिक रूपें टाकून देऊन तें व्यापक ज्ञानावर अधिष्ठित असें प्रकाशमय, शांत, प्रगाढ प्रेम करूं लागतें, व ईश्वराच्या सान्निध्याचा सर्वोत्तम आनंद भोगीत त्याची अमर्याद भक्ति करूं लागतें, आणि या भक्तीचा आध्यात्मिक आनंद, अव्याहत भक्तिसमाधिसुख अनुभवतें, तेव्हां हें पूर्ण ज्ञान प्राप्त होतें. मानवी आत्मा आपलें विभक्त व्यक्तित्व टाकून देतो आणि ब्रह्म होतो, तेव्हांच तो खऱ्या पुरुषांत, खऱ्या पुरुषाच्या रूपानें जीवन व्यतीत करूं शकतो,

पान क्र. ६


 

तेव्हांच त्याच्या ठिकाणीं पुरुषोत्तमाविषयीं परम भक्ति उत्पन्न होते, तेव्हांच त्याला या आपल्या परा भक्तीच्या बळावर, हृदयाच्या ज्ञानाच्या बळावर, पुरुषोत्तमाचें पूर्ण ज्ञान होतें. भक्त्या मामभिजानाति ।

गी.नि. खं.२ भा.२ प्र.२२ -- निवड : दारा. २१ मार्च

 

६. मानवी जीवनाचें उद्दिष्ट ईशप्राप्ति

याच पृथ्वीवरील जीवनांत, इतरत्र नव्हे, साधकानें सर्वश्रेष्ठ ईश्वर मिळवावयाचा असतो, आपल्या आत्म्याची दिव्य प्रकृति विकसित करावयाची असते, अपूर्ण भौतिक प्रकृति त्यानें टाकावयाची असते. या अपूर्ण भौतिक प्रकृतींतूनच क्रमश: दिव्य प्रकृतीचें विकसन साधावयाचें असतें. ईश्वर, मानव आणि निसर्ग यांच्याशीं एकता साधून अस्तित्वाचे विशाल सत्य पूर्णतया येथेंच साधकानें शोधून आत्मसात् करावयाचें असतें आणि तें आचरणांत आणून त्याची अद्‌भुतता सर्वांना प्रकट होईल असें करावयाचें असतें. आम्हांला जन्म-चक्रांतून जें एकसारखें जावें लागत असतें तें आमचें फिरणें, तो आमचा दीर्घ चक्रगतीचा प्रवास, आतांच सांगितल्याप्रमाणें, ईश्वरप्राप्ति आदि गोष्टी सिद्ध झाल्यावरच संपतो. हें जन्मचक्र परमोच्च फळ आम्हांला देऊन विराम पावतें. मानवी जन्म आत्म्याला जो दिला आहे, ती त्याला एक मोठी संधि दिली आहे. ही संधि म्हणजे ईश्वर प्राप्त करून घेण्याची संधि होय. ही संधि जोंवर सफल होत नाहीं, तोंवर मानवी जन्म पुनःपुनः घेणें अटळ असतें. मानवजन्माच्या या निकडीच्या अंतिम उद्देशाच्या दिशेनें ईश्वरभक्त सारखीं पावलें टाकीत असतो. तो एकतानतेनें ईश्वरावर प्रेम करतो, त्याची भक्ति करतो. सर्वातीत, सर्वरूप ईश्वर हाच आपल्या जीवनाचें एकमेव ध्येय, आपल्या विचाराचें, दृष्टीचें आणि ज्ञानाचें एकमेव ध्येय करून तो वागत असतो. अहंमय, पार्थिव वासनातृप्ति

पान क्र. ७


 

किंवा स्वर्गांतील सुखें यांना आपल्या जीवनांतील ध्येयाची जागा तो मुळींच देत नाहीं. तो आध्यात्मिक जीवन जगतो. तो कोठेंहि, केव्हांहि ईश्वराखेरीज कांहींच बघत नाहीं. प्रत्येक क्षणीं तो ईश्वराशीं एकरूप असतो. सर्व भूतांत तो ईश्वर पहातो व त्याजवर प्रेम करतो. सर्व वस्तूंत तो ईश्वराचा आनंद भोगतो. त्याच्या आध्यात्मिक जीवनाचें पायाभूत असें स्वरूप नेहमीं असें असतें. त्याला घडणारें ईश्वरदर्शन त्याची जीवनापासून ताटातूट करीत नाहीं आणि पूर्ण जीवनाच्या कोणत्याहि गोष्टी त्याला कमी पडत नाहींत; कारण, ईश्वर स्वतःच आपण होऊन त्याला हिताची प्रत्येक गोष्ट पुरवितो. त्याच्या बाबतींत आंतर आणि बाह्य प्राप्य गोष्टींची प्राप्ति व त्यांचें रक्षण (क्षेम) स्वत: करतो. योगक्षेमं वहाम्यहम् । या ईश्वरभक्ताच्या संपत्तीच्या दृष्टीनें पार्थिव सुख व स्वर्गीय सुख या गोष्टी केवळ या संपत्तीच्या क्षुद्र छाया असतात. कारण हा भक्त जसजसा ईश्वराचें ईश्वरत्व आत्मसात् करीत जातो, तसतसा ईश्वर पण आपल्या अनंत अस्तित्वाचा आनंद, सामर्थ्य व प्रकाश यांचा त्याजवर वर्षाव करीत जातो.

गी.नि. खं.२ भा.१ प्र.६ -- निवड : द्युमान्. २१ मार्च

 

७. पूर्ण परिपूर्तीचा मार्ग

पूर्णयोगाच्या साध्याची पूर्ण व्याख्या अशी करतां येईल : विश्वप्रकृतीनें आपल्या ठिकाणीं जें सत्य लपवून ठेवलें आहे व जें सत्य प्रकट करण्याच्या धडपडींत ती आहे, तें सत्य वैयक्तिक अनुभवांत साकार करणें म्हणजे पूर्णयोग; मानवी आत्म्याचें दिव्य ईश्वरी आत्म्यांत रूपांतर करणें व त्याच्या प्राकृतिक जीवनाचें दिव्य जीवनांत रूपांतर करणें म्हणजे पूर्णयोग...

ही पूर्ण परिपूर्ति घडून येण्यासाठीं खात्रीचा मार्ग हा आहे कीं,

पान क्र. ८


 

आमच्या अंतरीं राहणाऱ्या गूढज्ञ गूढाधिपाला आम्हीं शोधून काढावे आणि आमच्यांत परिवर्तन घडवून आणण्यासाठीं त्याच्या आधीन आम्हीं नेहमीं रहावें : कारण त्याच्या ठिकाणीं दिव्य सामर्थ्य, दिव्य ज्ञान व दिव्य प्रेम सर्व एकत्र आहेत. आमच्या अहंप्रधान जाणिवेला या गूढाधिपाच्या ताब्यांत स्वतःस देणें आरंभीं जड जातें; आणि तिनें ही अवघड गोष्ट केली तरी पुढें आमच्या प्रकृतीच्या प्रत्येक अंगांत पूर्णतया हें अंकितत्व स्वीकारणें तिला अवघड जातें. या जाणिवेला आरंभ जड जातो याचें कारण आमच्या अहंप्रधान अशा ज्या विचाराच्या, संवेदनांच्या, भावनेच्या संवयी असतात, त्या संवयींमुळें ते रस्तेच बंद होतात, ज्या रस्त्यांनीं जाणें गूढाधिपाची ओळख होण्यासाठीं आम्हांला आवश्यक असतें. मोठ्या कष्टानें आमच्या अहंप्रधान जाणिवेनें गूढाधिपाची ओळख करून घेऊन त्याच्या हातीं स्वतःला दिलें, तरी पुढें त्याच्या आदेशप्रमाणें वागणें तिला जड जातें याचें कारण, अहम् नें झांकोळलेल्या आत्म्याला योगमार्गांत आवश्यक असलेली श्रद्धा, आत्मसमर्पण-वृत्ति, धैर्य या गुणांची प्राप्ति अवघड होऊन बसते. अहंनिष्ठ मनाला दिव्य ईश्वरी कार्यपद्धति नापसंत असते; चुका करीत करीत सत्य गांठावें, दुःख भोगीत भोगीत सुख गांठावें, दोष करीत करीत पूर्णता गांठावी हा मार्ग अहंनिष्ठ मनाला आवडतो; गूढाधिपाचें, ईश्वराचें नेतृत्व अहंभावानें पत्करलें, तर हें नेतृत्व त्याला कोणीकडे घेऊन जात आहे हें त्याला कळत नाहीं आणि मग तो या नेतृत्वाच्या विरुद्ध उभा राहतो, या नेतृत्वावरील त्याचा विश्वास नाहींसा होतो, त्याचें धैर्य गळतें. अहंभावाचे हे दोष फारसे मारक, नुकसानकारक होत नाहींत. कारण, आम्हांमधील मार्गदर्शक ईश्वर आमच्या विरोधानें नाराज होत नाहीं, आमच्या गैरविश्वासानें निरुत्साही होत नाहीं, आमच्या दुबळेपणामुळें आम्हांला कंटाळत नाहीं; त्याच्या ठिकाणीं मातेचें पूर्ण वात्सल्य असतें, गुरूचें पूर्ण सहिष्णुत्व असतें. परंतु, आम्हीं ईश्वराच्या

पान क्र. ९


 

मार्गदर्शनाला दिलेली संमति काढून घेतली, म्हणजे या मार्गदर्शनामुळें आमचें जें हित होत असतें तें आम्हांला कळत नाहीं. -- अर्थात् आम्हांला तें न कळलें तरी, आमचें हित व्हावयाचें सर्वथा रहात नाहीं; निदान अंततः ईश्वराच्या मार्गदर्शनानें आमचें हित होतेंच होतें. आम्ही आपली संमति काढून घेतो याचें कारण, आम्हांला आमचा श्रेष्ठ आत्मा व कनिष्ठ आत्मा यांतील अंतर कळत नाहीं. कनिष्ठ आत्म्याच्या द्वारां आपला आत्माविष्कार आमचा श्रेष्ठ आत्मा करूं पाहत असतो हें आम्हांला कळत नाहीं. या जगांत आम्हांला ईश्वर दिसूं शकत नाहीं याचें कारण ईश्वर आमच्या ठिकाणीं जें कार्य करतो तें आमच्या प्रकृतीच्या द्वारां करतो, एकामागून एक नियमबाह्य चमत्कार तो करीत नाहीं. त्याचें दर्शन न घडण्याचें हेंच विशेष कारण आहे. मनुष्याला श्रद्धा उत्पन्न होण्यासाठीं चमत्कार हवे असतात; त्याचे डोळे दिपविणारें कांहीं घडलें म्हणजेच तो पाहूं शकतो; म्हणून डोळे दिपविणारें कांहीं घडावें अशी इच्छा तो करीत असतो.

यो.स. साधन-चतुष्टय -- निवड : दत्ता. २३ मार्च

 

८. परमेश्वर संपूर्ण समर्पण अपेक्षितो

तेव्हां परमेश्वर आम्हांपासून जें मागत आहे तें हें कीं, आम्हीं आमचें अखिल जीवन जाणीवपुर:सर त्यागमय करावें. आमच्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण, आमच्या जीवनाची प्रत्येक हालचाल सनातन ईश्वराच्या उद्देशानें केलेल्या अखंड भक्तिमय आत्मदानाचा भाग होईल असें आम्हीं करावयास हवें. आमचीं सर्व कर्में -- महान्, असामान्य, भव्योदात्त कर्में, तशींच लहानांत लहान, सामान्यांत सामान्य किरकोळ कर्में, हीं सर्व ईश्वराला वाहिलेलीं, समर्पित कर्में झालीं पाहिजेत. आम्हांहून पलीकडे, आमच्या 'मी' हून मोठें असें कांहीं तत्त्व आहे आणि

पान क्र. १०


 

त्याला उद्देशून आमची आंतरिक व बाह्य कृति समर्पित केलेली आहे, या एका जाणिवेनें आमची वैयक्तिक प्रकृति भरलेली असली पाहिजे. आम्हीं कांहींहि दिलें आणि कुणालाहि दिलें, तरी या दानकर्मांत ही जाणीव असली पाहिजे कीं, सर्व जीवांत वास करणाऱ्या एकमेव ईश्वराला आम्हीं दिलेली वस्तु वाहत आहों. आमचे अगदीं सामान्य व्यवहार, आमचीं अगदीं स्थूल भौतिक कर्में यांना देखील उदात्त स्वरूप आलें पाहिजे; आम्ही कांहीं खातों तेव्हां आम्हांला ही जाणीव हवी कीं, आमच्यांतील ईश्वराला आमचें अन्न आम्ही अर्पण करीत आहों; मंदिरांत देवाला आम्ही कांहीं पवित्र बुद्धीनें वाहतों, त्याप्रमाणें आमचें अन्न आम्हीं आमच्यांतील ईश्वराला वाहिलें पाहिजे; शरीराची गरज भागविली, किंवा शरीराला सुख दिलें असल्या भावना आमच्यांतून पार नाहींशा झाल्या पाहिजेत; निदान त्यांच्याबरोबर समर्पणाची भावना नित्य सहचर म्हणून असली पाहिजे. एकादा महान् उद्योग केला, एकादी श्रेष्ठ साधना, संयम केला, एकादें अवघड, उदात्त साहस केलें, मग तें सर्व स्वतःकरतां असो, दुसऱ्याकरतां असो, वा मानवजातीकरतां असो; मानवजात, साधक स्वत:, किंवा दुसरे लोक या कल्पनांपाशीं थांबणें कर्मयोगाच्या साधकाला शक्य होणार नाहीं. तो जें कांहीं करील तें कर्म यज्ञ म्हणून त्यानें या कर्मविषयांच्या द्वारां किंवा प्रत्यक्षतः एका ईश्वरालाच जाणीवपूर्वक समर्पित केलें पाहिजे. मानवजात वगैरे रूपांत ईश्वर पूर्वींहि होता पण तो अज्ञात होता. आतां तो ज्ञात झाल्यावर आमच्या आत्म्याला, मनाला व इंद्रियांना तो नेहमीं प्रतीत व्हावयास हवा, त्यांच्यापासून लपलेला राहतां कामां नये. आमच्या कर्माचा व्यापार आणि त्याचीं फलें आम्हीं त्या 'एका'च्या हातांत ठेवलीं पाहिजेत. आमची भावना अशी असली पाहिजे कीं, आमचे परिश्रम, आमची उच्च आकांक्षा या गोष्टी त्या एका अनंत पुरुषोत्तमाच्या इच्छेमुळेंच शक्य होतात. सर्वकांहीं घडतें तें त्याच्या अस्तित्वाच्या पोटांत घडतें. आमचे परिश्रम, आमची उच्च

पान क्र. ११


 

आकांक्षा प्रकृति आम्हांपासून घेऊन त्याच्या वेदीवर अर्पण करते. कांहीं गोष्टींत प्रकृति स्पष्टपणें स्वत: काम करते व आम्ही फक्त तिच्या कार्याचे साक्षी असतो, या कर्माचें क्षेत्र आणि आधार असतो; अशी वस्तुस्थिति दिसत असली, तरी आमच्या ठिकाणीं ही जाणीव व स्मृति नित्य असली पाहिजे कीं, प्रकृतीनें केलेल्या कर्माचा प्रभु ईश्वर आहे, सर्व कर्माचा प्रभु ईश्वर आहे. आमचा श्वास व उच्छ्वास, आमच्या हृदयाचे ठोके हे देखील जाणिवेनें मुक्त झाले पाहिजेत; आणि ते तसे करतां येतात. विश्वयज्ञांतील जिवंत तालबद्धता, संगीत आम्ही आहोंत अशी जाणीव आमच्या श्वासोच्छवासांना व हृदयाच्या ठोक्यांना झाली पाहिजे.

गी.नि. भा.२ परमगुह्य -- निवड : अमल किरण. २४ मार्च

 

९. तूं पूर्ण शरण आलास तर मी काय करीन

तूं मला पूर्णपणें शरण येऊं शकलास, तुझ्यामध्यें आणि सर्व वस्तूंमध्यें असणाऱ्या आत्म्यावर आणि ईश्वरावर अवलंबून राहणें व त्याचें एकाचेंच मार्गदर्शन श्रद्धेनें पत्करणें तुला शक्य झालें, तर हा सर्व वैयक्तिक आत्यसंयमादि प्रयत्न करण्याची गरज शेवटीं तुला राहणार नाहीं; अनेक नियम आणि धर्म यांचें बंधन, आध्यात्मिक मार्गक्रमणांतील अडचणी आणि अडथळे समजून तुला शेवटीं बाजूला टाकून देतां येतील. माझें तुला सांगणें आहे कीं, तूं आपलें मन सर्वस्वीं माझ्याकडे लाव. माझ्या विचारानें, माझ्या स्वरूपानें तें भरून टाक. तुझें हृदय सर्वस्वीं माझ्याकडे लाव. तुझें प्रत्येक कर्म, मग तें कांहींहि असो, तूं मला यज्ञबुद्धीनें हविर्भाग म्हणून अर्पण करीत जा. तूं एवढें कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोंपव. तुझें जीवन, तुझा आत्मा, तुझा व्यवहार सर्वस्वीं माझ्या इच्छेवर सोंपव, या सर्व बाबतींत माझ्या इच्छेप्रमाणें मला करूं दे. तुझें मन आणि हृदय, तुझें जीवन आणि तुझा व्यवहार या

पान क्र. १२


 

बाबतींत मी काय करीन त्यानें तुझा गोंधळ होऊं देऊं नकोस, तें पाहून तूं दुःख करीत बसूं नकोस. मानव आपली मर्यादित इच्छाशक्ति आणि बुद्धिशक्ति यांना मार्गदर्शन व्हावें म्हणून कांहीं व्यवहारनियम, कांहीं धर्म स्वतःवर बंधनकारक म्हणून स्वीकारतो -- हे नियम आणि धर्म तुझ्या मनाशीं हृदयाशीं वगैरे होणाऱ्या व्यवहारांत पाळलेले तुला दिसले नाहींत, तर तूं स्वतःला त्रास करून घेऊं नकोस. माझे मार्ग म्हणजे पूर्ण इच्छाशक्तीचे, पूर्ण बुद्धिशक्तीचे मार्ग होत. माझे मार्ग म्हणजे पूर्ण सूज्ञतेचे, पूर्ण सामर्थ्याचे, पूर्ण प्रेमाचे मार्ग आहेत. माझ्या प्रेमादि शक्तींना सर्वकांहीं ठाऊक असतें. अंतिम परिणाम निर्दोष व पूर्ण व्हावा यासाठीं त्या दृष्टीनें या शक्ति आपल्या सर्व व्यापारांची जोड आणि जुळणी करत असतात; मानवाची सर्वांगीण पूर्णता हें माझें साध्य आहे, या पूर्ण अवस्थेचीं अनेक अंगें अनेक धाग्यांसारखीं आहेत, हे धागे बारीक सुरेख करणें आणि ते एकत्र करून विणणें -- व मानवी पूर्णतेचा सुंदर पट तयार करणें -- हाच माझ्या शक्तींचा आपल्या विविध व्यापारांची जुळणी करण्यांतील हेतु असतो. मी हा येथें तुजजवळ आहे, तुझ्या युद्धरथांत आहे, तुझ्या आंतील आणि तुझ्या बाहेरील अस्तित्वाचा मी प्रभु आहे हें तुला मीं पटवून दिलें आहे; आणि तो मी, तुला हें निश्चित, बदल न होणारें वचन देत आहे कीं, तुला सर्व दुःखांतून आणि संकटांतून पार पाडून, मी तुला माझ्या स्वतःजवळ आणीन. कसल्याहि अडचणी, कसल्याहि गोंधळाच्या अवस्था मार्गांत येवोत, सर्व प्रसंगीं ही खात्री बाळग कीं, मी तुझा वाटाड्या आहे आणि मी तुला विश्वपुरुषांत राहून पूर्ण दिव्य जीवन जगण्यास समर्थ करणार आहे; तसेंच विश्वातीत परम पुरुषाच्या ठिकाणीं राहून अमर अस्तित्व भोगण्यासहि समर्थ करणार आहे.

यो.स. प्र.४ -- निवड : द्युमान्, २४ मार्च

पान क्र. १३


 

१०. भक्त हा ईश्वराचें कर्मसाधन आहे

तूं ईश्वराचें कर्मसाधन आहेस आणि हें स्थान नम्रपणें पण अभिमानानें, भक्तिमय सेवाभावानें आणि आनंदानें तूं स्वीकारावेस. मालकाचें, ईश्वराचें निर्दोष व पूर्ण कार्यक्षम साधन होण्यापेक्षां अधिक गौरवास्पद व अभिमानास्पद गोष्ट व्यक्तीला असूं शकत नाहीं. ... ईश्वराचा निःश्वास तुझा प्रेरक प्राण व्हावा. तूं वादळाच्या गतीबरोबर उडणाऱ्या वाळक्या पानाप्रमाणें व्हावेंस. तूं स्वतःला ईश्वराच्या हातांत सर्वस्वीं द्यावेंस आणि त्याच्या प्रेरणेनुसार प्रहार करणाऱ्या तलवारीप्रमाणें व लक्ष्यावर उडी घेणाऱ्या बाणाप्रमाणें तूं वागावेंस. तुझें मन, यंत्रांतील स्थितिस्थापक पोलादी पट्टीप्रमाणें, तुझी प्राणशक्ति, वाफेनें गतिमान् होणाऱ्या दट्ट्याप्रमाणें, तुझें काम, वस्तूला विशिष्ट आकार देणाऱ्या यांत्रिक पोलादी रंध्याप्रमाणें असावें. ऐरणीवर पडणारा घण, कारखाना चालवणारें वेगवान् गतियंत्र, व उंच आवाजानें दवंडी देणारें शिंग, तालबद्ध लहरींनीं आसमंत भरून टाकतात त्याप्रमाणें तुझी वाणी तालबद्ध, उंच, घुमणारी, घणाघाती होऊन तिनें ईश्वरी सामर्थ्याच्या घोषणेनें आसमंत भरून टाकावा. तुझ्या प्रकृतिधर्मानुसार जें कांहीं नियतकर्म असेल, तें तूं ईश्वराच्या हातांतील यंत्राप्रमाणें करावेंस ही मुख्य गोष्ट आहे.

तलवार मला निर्माण करा असें सांगत नाहीं, वापरणारा तिला कसाहि वापरो, त्याला ती आडवी येत नाहीं; वापरून मोडून गेली, तरी त्याचें तिला दुःख नाहीं. तलवारीला तिची घडण चालली असतां, तिचा वापर चालला असतां, तिला बाजूला ठेवून दिलें असतां, तिला मोडून टाकलें असतां -- सर्व स्थितिगतींत, सर्वत्र, एकच आनंद मिळतो त्याची किल्ली तूं शोधून काढ.

'आर्य' -- कर्मांतील आनंद -- निवड : चंदुलाल. २५ मार्च

पान क्र. १४


 

११. ईश्वररूपी मालकास जाणून घे

व्यक्ति आणि प्रकृतीहून वेगळा असलेला हा मालक, तूं आहेस. या मालकाची ओळख करून घेणें हें तुझें एक शेवटचें काम आहे. कोणतेंहि रूप, कोणताहि गुण त्याला चिकटवूं नकोस, त्याच्याशीं एकरूप हो. तुझें अस्तित्व त्याच्याशीं एकरूप कर. तुझ्या जाणिवेंत त्याचें अनुसंधान ठेव. तुझी शक्ति त्याच्या आज्ञेंत ठेव. त्याचा अंकित होऊन रहा. आनंदांत असतां त्याच्या बाहूंत प्रवेश कर. तुझ्या जीवनांत, प्राणव्यापारांत, देहांत, मनांत, तुझ्या व्यवहारांत त्याच्या आदेशाप्रमाणें वागून त्याला कृतार्थ कर.

याप्रमाणें मालकाचा आनंद आपलासा केल्यावर, झगडून मिळवावयाचें असें तुला कांहीं रहाणार नाहीं. कारण, मालक तुझी खाजगी संपत्ति, तुझा खाजगी वांटा म्हणून स्वतःला तुझ्या हातीं सोंपवील व स्वतःबरोबर सर्व वस्तु, सर्व जीवांच्या जवळ असलेली व त्यांनीं मिळवून आणलेली नानाविध संपत्ति, सर्व जीवांच्या साऱ्या क्रिया आणि त्यांचे सारे भोग तुला तुझी खाजगी संपत्ति, तुझा खाजगी वांटा म्हणून देऊन टाकील, त्याशिवाय ज्याचे भाग किंवा वांटे करतां येत नाहींत असेंहि कांहीं तो तुला देईल.

'आर्य' -- कर्मांतील आनंद -- निवड : श्रीमाताजी. २५ मार्च

 

१२. भक्ताची माता -- ईश्वर

भक्त हा ईश्वराकडे माता म्हणून बघतो. त्याला कांहींहि हवेंसें वाटलें, त्याला कांहीं त्रास झाला कीं तो ईश्वररूप मातेकडे धांव घेतो; आणि त्या मातेला हेंच हवें असतें. तिला आपलें हृदयांतील प्रेम सारखें प्रकट करावेंसें वाटत असतें. भक्त या मातेकडे धांव घेतो त्याचें कारण मातृविषयक प्रेम माणसाच्या ठायीं स्वभावतःच उत्कट असतें, आणि

पान क्र. १५


 

आम्हांला जगांत भटकंति करून कंटाळा आला म्हणजे आम्ही प्रेमामुळें घराकडे आणि मातेकडे धांव घेतो व मातेच्या अगदीं जवळ बसण्यांतच आम्हांला खरा आराम मिळतो.

यो.स. भक्तियोग. प्र.३ -- निवड : अमृता. २५ मार्च

 

१३. परमेश्वरासाठीं पूर्ण-कर्म करण्याची जरुरी

आमच्या ठिकाणीं आणि सर्व जीवांच्या ठिकाणीं असणाऱ्या परमेश्वरासाठीं तुम्हीं पूर्ण (सर्वांगपूर्ण) कर्म करावें अशी पूर्ण ईश्वरभक्तीची मागणी असते. सामान्य मनुष्य कर्में करतो तो एखाद्या पापी वासनेसाठीं किंवा पुण्य-कामनेसाठीं करतो; एखाद्या मानसिक सामान्य किंवा उदात्त निवडीसाठीं करतो; किंवा एखाद्या प्राणतत्त्वाच्या हीन किंवा उच्च ऊर्मीसाठीं करतो; किंवा एखाद्या मिश्र मानसिक वा प्राणिक हेतूसाठीं करतो. तुमचें ''पूर्ण'' कर्म याहून अगदीं वेगळें असेल. तें वासनाशून्य व खरें स्वतंत्र असें कर्म असेल. वासनाशून्य निष्काम कर्म कांहींच प्रतिक्रिया उत्पन्न करीत नाहीं, कांहींच बंधन उत्पन्न करीत नाहीं. चार पायऱ्यांनीं कर्म ''पूर्ण'' होतें; कर्तव्य कर्म म्हणून पूर्ण समबुद्धीनें आणि शांत चित्तानें (ईश्वरी प्रेमावांचून) आध्यात्मिक जबाबदारीच्या सूक्ष्म बंधनाला मान देऊन कर्म करणें ही पहिली पायरी; तसेंच शांत चित्तानें ईश्वरासाठीं यज्ञ करण्याच्या बुद्धीनें कर्म करणें ही पहिलीहून उंच पायरी; ईश्वराशीं शांतपणें, समाधानानें एकरूप होऊन या समाधानाची अभिव्यक्ति म्हणून कर्म करणें ही तिसरी उच्चतर पायरी आणि चौथी पायरी, ईश्वराशीं प्रेमानें, भक्तीनें एकरूप होऊन कर्म करणें ही. प्रेमानें ईश्वराशीं एकरूप होण्यानें शांत समाधानाहून उच्चतर असा प्रबळ सखोल आनंद लाभतो -- अहंवादी स्वार्थी वासनेच्या तृप्तीचा क्षुद्र उत्साह, हें या आनंदाचें स्वरूप नसतें -- अनंत आनंदाचा

पान क्र. १६


 

महासागर, हें या प्रेममूलक भक्तिजन्य ईश्वरैक्याच्या आनंदाचें स्वरूप असतें. भक्तिमूलक अद्वैत तुम्हांला साधल्यावर तुम्ही जें कर्म कराल, त्या कर्माच्या प्रसंगीं तुमचा प्रियतम ईश्वर तुमच्या जवळ असलेला तुम्हांला दिसेल आणि त्या ईश्वराविषयीचें तुमचें विशुद्ध दिव्य प्रेम, व तुम्हांला आपादमस्तक हालवून सोडणारी त्याच्या भक्तीची भावना तुमच्या कर्मांत व्यक्त होईल; तुमच्या ठिकाणीं आणि सर्व भूतांच्या ठिकाणीं असलेल्या ईश्वरासाठीं परिश्रम करण्याचा आनंद तुम्हांला कर्म करण्याची प्रेरणा सारखी देत राहील. कर्मांना आणि ज्ञानाला भक्ति ही मुकुटाप्रमाणें आहे; कर्म काय, ज्ञान काय, भक्तीवांचून शोभत नाहीं; भक्तीवांचून पूर्ण होत नाहीं.

निःशेष आत्मसमर्पणासाठीं, परिपूर्ण पूर्णतेसाठीं तुम्हांला उपयोगी पडेल अशी अत्यंत कार्यक्षम शक्ति म्हणजे ईश्वराचें प्रेम होय, ईश्वराची भक्ति होय : अर्थात् ही भक्ति म्हणजे सामान्य भक्ति नव्हे, तर ती भक्ति ज्ञान आहे, ती तुमच्या कर्मांचें खोल हृदय होऊं शकते.

गी.नि. खं.२ प्र.२४ -- निवड : पवित्र, २६ मार्च

 

१४. ईशप्रेरित कार्यावर लक्ष केंद्रित कर

अहंकार ! अहंकार सर्व दूर कर. सुख-दुःख, लाभ-हानि, सर्व सांसारिक फळें दृष्टीआड कर, ईश्वराच्या आदेशानुसार जो पक्ष तुला संभाळला पाहिजे, जें कार्य तुला केलें पाहिजे त्या पक्षावर, त्या कार्यावर तुझी दृष्टि खिळव, तिला इकडे तिकडे कोठेंहि चळू देऊं नको.

गी.नि. खं.१ प्र.७ -- निवड : सत्येन. २६ मार्च

पान क्र. १७


 

१५. यज्ञबुद्धीनें कर्म समर्पण केल्याचें फळ

सर्व कर्में हीं, श्रेष्ठ कर्मप्रभूला यज्ञबुद्धीनें समर्पण करण्यांत येतात; आणि हा कर्मप्रभु, संकल्पप्रभु या नात्यानें साधकाच्या यज्ञसंकल्पांचें सत्त्व पाहून त्याचें ओझें आपल्या शिरावर घेतो आणि साधकाच्या कर्माची, त्याच्या दिव्य प्रकृतीच्या कर्माची जबाबदारी स्वतःवर घेतो; आणि सर्वांचा, मानवांचा आणि इतरांचा मित्र आणि प्रेमी असणाऱ्या पुरुषोत्तमाचा भक्त, आपल्या पुरुषोत्तमविषयक प्रेमाच्या उच्च अवस्थेंत जेव्हां आपली सारभूत जाणीव आणि सुखलालसा पुरुषोत्तमाला वाहतो, तेव्हां पुरुषोत्तम तांतडीनें धांवून येतो, आणि तारणारा व मोक्ष देणारा या नात्यानें त्याला आलिंगन देऊन, त्याचें मन, हृदय, शरीर आपल्या सुखद बाहुपाशांत घेऊन त्यांचा गौरव करतो, आणि या नश्वर प्रकृतीच्या मृत्युसागराच्या लाटांच्या तावडींतून त्याला वर घेऊन, शाश्वताच्या हृदयांत त्याला सुरक्षित असें स्थान देतो.

गी.नि. खं.२ प्र.१२ -- निवड : ताजदार. २७ मार्च

 

१६. पुरुषोत्तमाशीं एकरूप होण्यासाठीं

आमच्या पूर्णतर दृष्टीला अक्षरब्रह्माच्या पलीकडे प्राणमय अनंत, अमेय दिव्य महापुरुष दिसतो; या महापुरुषापासून, या पुरुषोत्तमापासून सर्व कांहीं निघालें आहे, या पुरुषोत्तमांतच सर्व कांहीं सामावलें आहे; विश्व आणि विश्वात्मा, आमची प्रकृति आणि आमचा आत्मा तेथून निघतात, तेथेंच वावरतात, त्याचेंच संतान आणि त्याचेच ते अंश आहेत. आम्ही अक्षर ब्रह्माच्या पलीकडे असलेला हा असा महापुरुष सूक्ष्मतर पूर्णतर दृष्टीनें पाहूं शकतो. आम्ही आमच्या विकासक्रमांत अक्षरब्रह्माच्या पुढें जाऊन या पुरुषोत्तमाशीं आत्मत:, चैतन्यत: एकरूप झालों, म्हणजे आम्ही आमचा विलय करून घेत नाहीं, तर आम्ही

पान क्र. १८


 

आमचे खरे आत्मे परत मिळवितो. अनंताच्या परमोच्च अवस्थेंत स्थिरपणें राहणारे असे ते आमचे आत्मे असतात. तीन एककालिक कार्यक्रम पुरुषोत्तमाशीं एकरूप होण्यासाठीं केले जातात, करावे लागतात; (१) कर्माचा कार्यक्रम : पुरुषोत्तमाच्या आणि आमच्या आध्यात्मिक प्रकृतीच्या पायावर आधारलेलीं कर्में करून, पूर्ण आत्मदर्शनाचा लाभ करून घेणें; (२) ज्ञानाचा कार्यक्रम : ज्याच्या ठिकाणीं सर्व आहे आणि जो सर्व झाला आहे त्या परमेश्वराच्या ज्ञानाच्या आधारें पूर्ण आत्मरूप होणें; (३) भक्तीचा कार्यक्रम : हा कार्यक्रम सर्व कार्यक्रमांत श्रेष्ठ आणि निश्चितपणें ऐक्य निर्माण करणारा आहे. या कार्यक्रमांत पूर्ण आत्मदान, आत्मसमर्पण करण्यांत येतें; हें आत्मसमर्पण अर्थातच सर्वरूप, सर्वातीत परमेश्वराच्या चरणीं सर्वभावसंपन्न प्रेमभक्तीनें करण्यांत येतें; आमच्या कर्मांचा स्वामी म्हणून, आमच्या हृदयाचा निवासी म्हणून, आमच्या जाणीवयुक्त निःशेष अस्तित्वाचें आणि जीवनाचें समावेशक क्षेत्र म्हणून, या सर्वरूप सर्वातीत प्रभूकडे आम्ही आकर्षिलें जाऊन आम्ही आमचें सर्वस्व त्याच्या चरणीं पूर्ण प्रेमभक्तीनें अर्पण करतों. आम्ही जें काय, जें कांहीं आहों, त्याचा तो दाता, धर्ता असल्यानें आम्ही जें कांहीं आहों तें सर्व त्याला देऊन टाकतों. आमचें हें आत्मविषयक पवित्रीकरण, आत्मसमर्पण अखंडपणें चालूं राहिलें, म्हणजे आमचें सर्व ज्ञान हें ईश्वरविषयक ज्ञान बनतें आणि आमच्या सर्व कर्माला ईश्वराच्या सामर्थ्याच्या तेजाचें रूप येतें. आमच्या आत्मसमर्पणानें व्यक्त होणारी आमची प्रगाढ भक्ति आम्हांला त्याच्या अगदीं जवळ नेतें आणि त्याच्या सत्तेच्या अति खोल हृदयाचें रहस्य आम्हांला उघडें करून दाखवते. भक्ति ही, कर्म आणि ज्ञान या दोन यज्ञांना पूरक असा तिसरा यज्ञ आहे; कर्मयज्ञ, ज्ञानयज्ञ आणि भक्तियज्ञ मिळून पूर्ण यज्ञ होतो, यज्ञाची सांखळी पूर्ण होते. उत्तम रहस्याची, ईश्वराचें उत्तम रहस्य प्रकट करणारी गुरुकिल्ली कर्म, ज्ञान आणि भक्ति या तीन अंगांच्या एकत्रीकरणानेंच पूर्ण स्वरूप धारण करते.

गी.नि. खं.२ प्र.४ -- निवड : पुरुषोत्तम. २८ मार्च

पान क्र. १९


 

१७. आध्यात्मिक पूर्णत्व व समानत्व

आध्यात्मिक पूर्णत्वाची अगदीं पहिली गरज पूर्ण समत्व ही आहे. योगांत पूर्णत्व याचा अर्थ खालच्या अदिव्य प्रकृतींतून विकासक्रमानें वरच्या, उच्चतर दिव्य प्रकृतींत येणें हा आहे. ज्ञानाच्या बाबतींत हें पूर्णत्व म्हणजे उच्चतर आत्म्याचें अस्तित्व आत्मसात् करणें, अंधःकारमय, तुकड्या-तुकड्याच्या हीन आत्म्याचें विसर्जन करणें, किंवा आमची अपूर्ण अवस्था रूपांतरित करून आमचें खरें आध्यात्मिक व्यक्तित्व, सर्वसंग्रही प्रकाशमय पूर्ण व्यक्तित्व, हें रूप तिला देणें होय. भक्ति आणि पूजा या बाबतींत पूर्णत्व म्हणजे, आमची प्रकृति ईश्वराच्या प्रकृतीसारखी करणें, ईश्वराच्या अस्तित्वाचा नियम व आमच्या अस्तित्वाचा नियम सारखा करणें होय; आम्ही ज्या ईश्वराशीं जोडले जाण्याची आकांक्षा धरतो, त्याची व आपली प्रकृति समान होईल असें करणें म्हणजे पूर्णत्वसंपन्न होणें; कारण ही प्रकृतीची समानता नसेल, अस्तित्वाच्या नियमाची समानता नसेल, तर विश्वातीत, विश्वरूप आत्म्याची व आमच्या व्यक्तिरूप आत्म्याची एकता, सहयोगिता शक्य होणार नाहीं. श्रेष्ठ दिव्य ईश्वरी प्रकृति समतेवर आधारलेली आहे.

यो.स. भा.४ प्र.११ -- निवड : चंपकलाल. २८ मार्च

 

१८. आत्मसमर्पिताला ईश्वराचें आश्वासन

पूर्णपणें आत्मसमर्पण करण्याची मानवाची इच्छा आणि दृढ संकल्प हा परमात्म्याचे सर्व दरवाजे उघडूं शकतो, या संकल्पाच्या उत्तरादाखल

पान क्र. २०


 

परमात्मा मानवाला स्वतःचें (परमात्म्याचें) पूर्ण आत्मसमर्पण करून त्याच्यासाठीं पूर्णपणें खालीं उतरतो आणि असें झालें म्हणजे, आमची अपरा भौतिक प्रकृति त्वरेनें आध्यात्मिक प्रकृतींत रूपान्तरित होते, आणि दिव्य अस्तित्वाच्या कायद्याला धरून आमच्यांतील प्रत्येक गोष्टीचें रूप बदललें जातें, दिव्यत्वानें मुक्त केलें जातें. ईश्वर आणि मानव यांजमधील पडदा भक्ताच्या आत्मसमर्पण-संकल्पाच्या सामर्थ्यानें दूर केला जातो. हा संकल्प साधकाची प्रत्येक चूक, त्याची प्रत्येक अडचण नाहींशीं करतो. शाश्वत परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठीं स्वतःच्या मानवी बळावर ज्ञानाच्या, सदाचाराच्या कष्टयुक्त आत्मनियंत्रणाच्या मार्गानें जे उत्कटतेनें झटतात, त्यांना अनेक प्रकारच्या काळजींतून आणि अडचणींतून मार्ग काढावा लागतो; परंतु आमच्या मानवी आत्म्यानें आपला अहंकार आणि आपलीं कर्में ईश्वराला अर्पण केलीं कीं, ईश्वर स्वत: आमच्याकडे येतो आणि आमचें ओझें घेतो, आमचे सर्व काम करतो. आत्मसमर्पित अज्ञानी माणसांना तो दिव्य ज्ञानाचा प्रकाश पुरवतो, आत्मसमर्पित दुबळ्यांना तो ईश्वरी इच्छाशक्तीचें सामर्थ्य पुरवतो, पातकी आत्मसमर्पितांना तो दिव्य पावित्र्याचा मोक्ष देतो, दुःखी आत्मसमर्पितांना तो अनंत आध्यात्मिक आनंद देतो. अमुक आत्मसमर्पित मानव दुबळे आहेत, त्यांच्या मानवी बळाला ठेंचा खात चालावें लागतें म्हणून त्यांना कांहीं कमी द्यावें व इतरांना कांहीं अधिक द्यावें असा भेदभाव ईश्वर करीत नाहीं. ''माझा भक्त नाश पावणार नाहीं -- ही माझी प्रतिज्ञा आहे'' असें देव अर्जुनाला बजावीत आहे.

गी.नि. खं.२ प्र.६ -- निवड : अनिलवरण. २९ मार्च

पान क्र. २१


 

१९. परिपूर्ण ईश्वर-शरणता

सर्व योगमार्ग हें एक साधन आहे; आमच्या अस्तित्वाचा जो प्रभु, आमचा जो सर्वश्रेष्ठ आत्मा, त्याच्याशीं प्रथम कोणत्या तरी स्वरूपाचें ऐक्य साधणें आणि शेवटीं पूर्ण ज्ञान मिळवल्यावर त्याच्याशीं पूर्ण सर्वांगीण ऐक्य साधणें यासाठीं एक साधन, हें सर्व योगांचें स्वरूप आहे; आणि या योगांत सर्वश्रेष्ठ योग हा आहे कीं, सर्व प्रकृतीचा हा जो अंतर्निवासी प्रभु त्याला, आमच्या प्रकृतीच्या कोणत्याहि अडचणींत व गोंधळांत आम्ही सर्वथा शरण जावें; आमचें सर्व अस्तित्व, आमचें प्राणतत्त्व आणि शरीर, इंद्रियसंघ, मन, हृदय, बुद्धि, आमचें सर्व ज्ञान, इच्छा, कर्म, आमच्या जाणीवयुक्त आत्म्याचें आणि आमच्या साधनभूत प्रकृतीचें प्रत्येक अंग हा सर्व आमचा परिवार घेऊन आम्हीं कोणत्याहि प्राकृतिक अडचणींत, सर्व प्रकृतीच्या अंतर्निवासी प्रभूला सर्वथा शरण जावें हा सर्वश्रेष्ठ योग आहे (सर्व भावेन । गीता १८.६२). आम्ही सर्व प्रसंगीं ही ईश्वरशरणता पूर्णपणें पत्करू शकलों, म्हणजे मग ईश्वरी प्रकाश, प्रेम, सामर्थ्य आमच्या मदतीला येतें, आम्हांला जवळ करतें आणि आमचा आत्मा व त्याची साधनभूत प्राकृतिक अंगें यांत प्रविष्ट होऊन तीं भरून काढतें व आम्हांला, आमच्या आत्म्याला व आमच्या जीवनाला जे संशयाचे, अडचणींचे, गोंधळाचे, संकटाचे प्रसंग येतात, त्या प्रसंगांतून ही त्रयी (ईश्वरी प्रकाश, प्रेम, सामर्थ्य) आम्हांला सुखरूप पार नेते, आणि परम शांति आणि अमर शाश्वत पदाचें आध्यात्मिक स्वातंत्र्य यांचा लाभ आम्हांला करून देते. (परां शांतिम्, स्थानं शाश्वतम् -- गीता १८.६२).

गी.नि. खं.२ प्र.२२ -- निवड : राजंगम्. २९ मार्च

पान क्र. २२


 

२०. पूर्ण शांतींतच आत्मसाक्षात्कार

मन स्वच्छ, गतिशून्य समपातळीच्या पाण्यासारखें शांत झालें आहे, सर्व अस्तित्व पूर्ण शुद्ध, शांत आहे, आणि त्यांत मन अगदीं शांत झालें आहे, जीवात्मा विचाराच्या पलीकडे गेला आहे अशा क्षणींच आमच्या शुद्ध सारभूत अस्तित्वांत आत्मा (परमात्मा) स्वतःला व्यक्त करतो. हा आत्मा सर्व क्रियांचा व विकारांचा जनक असून त्यांच्या पलीकडे असतो; सर्व शब्द जेथें जन्मतात तें मौन, सर्व सापेक्ष घटना व वस्तु ज्या निरपेक्ष केवल वस्तूचीं आंशिक प्रतिबिंबें आहेत ती केवल सद्वस्तु हीं आत्म्याचींच नांवें आहेत, अर्थगर्भ अशीं नांवें आहेत. पूर्ण शांतींतच शांत शांत आत्म्याचा आदेश ऐकूं येतो; शुद्ध निश्चल अस्तित्वांतच त्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार घडतो. म्हणून त्याला आम्ही शांति (शान्तात्मा) म्हणतो, -- (मांडूक्य, शांतं शिवं अद्वैतम् ।) निश्चल वस्तु म्हणतो. (अनेजदेकम्।)

यो.स. ज्ञानयोग. प्र.३ -- निवड : नलिनीकांत. ३० मार्च

 

२१. तुमच्या पूर्णतेचें स्वरूप

तुमच्यामध्यें तुमच्याद्वारां ईश्वरच आपली स्वतःची इच्छा, आपलें स्वतःचें कार्य करणार; तुमचें वैयक्तिक हीन सुख, तुमची वैयक्तिक हीन इच्छा, वासना तृप्त करणें ही ईश्वराची इच्छा नसेल; विश्वकार्य, तुमचें दिव्य हित, विश्वांतील सर्वांचें प्रकट-अप्रकट हित हा ईश्वराचा हेतु, ही ईश्वराची इच्छा असणार आणि तुमच्या द्वारां, तुमच्या ठिकाणीं ही आपली इच्छा तो कार्यान्वित करणार, सिद्धीस नेणार. त्यामुळें तुम्हीं आंतबाहेर प्रकाशमय होऊन जाल. या प्रकाशांत तुम्हांला विश्वामध्यें, कालकृतींमध्यें ईश्वराची विभूति दिसेल, तुम्हांला त्याची योजना कळेल, तुम्हांला त्याचा आदेश ऐकूं येईल. ईश्वराची काय इच्छा असेल ती,

पान क्र. २३


 

तुमची प्रकृति ईश्वराचें क्रियासाधन या नात्यानें समजून घेईल आणि ती इच्छा, केवळ तीच इच्छा, कांहींएक तक्रार न करतां पूर्ण करील; कारण, तुमच्या प्रत्येक कृतीला आंतून व वरून जी ईश्वरी प्रेरणा मिळेल, त्या प्रेरणेबरोबर ईश्वरी चातुर्याचें, त्यांतील गाभ्याचें, मर्माचें अधिकृत ज्ञान तुमच्या प्राकृतिक आत्म्याला होईल व तुमचा हा आत्मा आपली ज्ञानपुरस्सर अनुमति, ईश्वरी चतुर प्रेरणेला देईल, देत आहे हें तुम्हांला कळेल. तुमच्या संसारांतील लढा ईश्वर लढेल, लढ्यांतील यश त्याचें असेल, तुमच्या संसारांत सार्वभौम सम्राटाचा अधिकार ईश्वराकडे राहील.

या विश्वांत, या शरीरांत असतांना तुमच्या पूर्णतेचें हें स्वरूप राहील; आणि कालांकित जीवनाच्या या विश्वापलीकडे तुम्हांला शाश्वत, सर्वोत्तम अतिचेतनता, अतिमानसिक जाणीव प्राप्त होईल आणि सर्वश्रेष्ठ चैतन्याच्या सर्वोच्च अवस्थेंत तुम्हीं कायमचे रहाल.

गी.नि. भा.२ प्र.२४ -- निवड : चिन्मयी. ३१ मार्च

 

२२. श्रद्धाच आम्हांला सामर्थ्य देते

आत्म्याची श्रद्धा, त्याचा केवळ बौद्धिक विश्वास नव्हे, तर जाणण्याची, पाहण्याची, विश्वास ठेवण्याची आणि आपल्या ज्ञानाच्या व दर्शन घडलेल्या सत्याच्या पायावर आपलें अस्तित्व व व्यवहार उभा करण्याची आत्म्याची सुसंगत दृढ इच्छा हीच तिच्या सामर्थ्याच्या प्रमाणांत, आम्ही काय होऊं शकूं हें ठरविते; आमचा आंतरात्मा आणि बाह्य आत्मा, आमची प्रकृति आणि आमची कृति ही सर्वोच्च, दिव्यतम, सत्यतम, शाश्वततम वस्तूकडे अशा सुसंगत, दृढ श्रद्धेनें व इच्छेनें वळणें हाच, आम्हांला परम पूर्णता प्राप्त करून घेण्याचें सामर्थ्य देणारा मार्ग आहे. गी.नि. भा.२ प्र.१८ -- निवड : राजंगम्. ३१ मार्च

पान क्र. २४


 

२३. पूर्ण आध्यात्मिकतेचें संपादन

अपरा प्रकृतीच्या मर्यादांतून बाहेर पडणें, सर्व भूतांशीं आत्मिक एकता संपादन करणें, विश्वचालकाशीं आणि विश्वातीताशीं एकरूप होणें, कर्मक्षेत्रांत स्वेच्छा ईश्वराच्या इच्छेशीं एकरूप करून वागणें, सर्वांतर्यामीं आणि सर्वातीत एकमेव परमेश्वरावर प्रेम करून, त्याची अनन्य भक्ति करणें -- हाच एक मार्ग असा आहे कीं, त्यायोगें प्राकृतिक आत्म्याच्या अतीत होऊन उपरिनिर्दिष्ट पूर्ण आध्यात्मिकता आम्हांला संपादन करतां येते, वर उल्लेखलेलें कल्पनातीत रूपांतर आमच्यामध्यें आम्हांला घडवून आणतां येतें.

गी.नि. भा.२ प्र.११ -- निवड : द्युमान्, १ एप्रिल

 

२४. दिव्यतासंपन्न जाणीव काय अनुभवते ?

आत्मा हा आत्म्याला, परमात्म्याला, ईश्वराला पाहतो; शारीर जाणीव जड द्रव्य जसें प्रत्यक्ष पाहूं शकते, तशी दिव्यतासंपन्न जाणीव ईश्वराला प्रत्यक्ष पाहूं शकते; नव्हे, शारीर जाणिवेहून दिव्य जाणिवेचें, आत्म्याचें प्रत्यक्ष पहाणें हें अधिक प्रत्यक्ष, अधिक जिव्हाळ्याचे असतें. आत्मा ईश्वराला पाहतो, स्पर्श करतो. त्याच्या भावना, विचार, संवेदना ईश्वरमय असतात. सर्व व्यक्त अस्तित्व हें, आध्यात्मिक जाणिवेला आत्मविश्व या रूपांत दिसतें; जड-विश्व, प्राण-विश्व किंवा मनोविश्व या रूपांत व्यक्त अस्तित्व आत्म्याला दिसत नाहीं; आत्मदृष्टीला मनोविश्व हें ईश्वरी विचाराचें विश्व, प्राण-विश्व हें ईश्वरी सामर्थ्याचें विश्व, जड-विश्व हें ईश्वराच्या आकाराचें विश्व म्हणून दिसत असतें.

गी.नि. भा.२ प्र.९ -- निवड : ताजदार. १ एप्रिल

पान क्र. २५


 

२५ खरें ज्ञान व त्याचें फळ

ईश्वराचें संपूर्ण ज्ञान आम्हांला होतें तेव्हां, तो एकमेवाद्वितीय सद्वस्तु आहे, सर्व आत्मा तोच आहे, सर्व अभिव्यक्ति तोच आहे, सर्व व्यक्ताच्या पलीकडे तोच आहे; एकाच वेळी, पूर्ण एकतेनें हें सर्व तोच आहे हें आम्ही उमजतों. पूर्ण सर्वभावयुक्त ईश्वराभिमुखता केवळ पूर्ण ज्ञानानें समाधान पावत नाहीं. या पूर्ण ज्ञानाबरोबर साधकाचें हृदय आणि आत्मा ईश्वराकडे उत्कंठेनें वळतात, हें पूर्ण ज्ञान साधकाच्या ठिकाणीं, एकचित्त आणि सर्वव्यापी प्रेम, भक्ति व सेवेची आकांक्षा निर्माण करतें, प्रज्ज्वलित करतें. तें खरें ज्ञानच नव्हे, ज्याच्या बरोबर उपरिनिर्दिष्ट आकांक्षा आणि उत्कंठा निर्माण होत नाहीं, जें हृदयाच्या आणि आत्म्याच्या ईश्वराभिमुख धांवण्यानें प्राणमय झालेलें नाहीं; असें ज्ञान केवळ बुद्धीची निष्फळ कसरत असते, बुद्धीला घडलेलें परिणामशून्य दर्शन असतें. आत्म्याला ईश्वराचें दर्शन घडतांच, त्याच्या ठिकाणीं ईश्वराची भक्ति आणि त्याच्या प्रगतीची उत्कंठा न चुकतां उत्पन्न होते; स्वयंभू स्वरूपांतील ईश्वर जसा या आत्म्याला उत्कट प्रेमाचा विषय होतो, तसा आम्हांमधील ईश्वर आणि सर्व अस्तित्वांतील वस्तूंमधील ईश्वर हा त्याला उत्कट प्रेमाचा विषय होतो. बुद्धीनें ईश्वर जाणणें म्हणजे केवळ ईश्वर काय आहे हें समजणें आहे. हें समजणें म्हणजे आत्मोद्धाराचा आरंभ होऊं शकतो, पण आत्मोद्धार होईलच असें सांगतां येत नाहीं. जाणण्यांत, समजून घेण्यांत जर कळकळ नसेल, आंतरिक साक्षात्कार आपल्याला घडावा अशी आंतून तीव्र इच्छा नसेल, आत्म्यावर त्या जाणण्याचा परिणाम घडून त्याला ईश्वराच्या भेटीची उत्कंठा लागली नसेल, तर तें जाणणें, समजणें, ज्ञान आत्मोद्धाराचा आरंभ निश्चित होऊं शकत नाहीं; मेंदूला वरवरचें कांहींतरी कळलें आहे, पण आंतून आत्म्याला कसलेंच दर्शन घडलेलें नाहीं असाच या बौद्धिक ज्ञानाचा अर्थ आहे. खरें ज्ञान म्हणजे आंतरिक पुरुषाला झालेलें ज्ञान होय. या

पान क्र. २६


 

अन्तर्वर्ति आत्म्याला प्रकाश दिसला, की तो त्या दिसलेल्या वस्तूला आलिंगन देण्यासाठीं पुढें होतो, तळमळीनें तो ती आपलीशी करूं इच्छितो, आपल्या ठिकाणीं तिचें रूप साकार करावें, आपण तिजसारखें व्हावें अशी धडपड तो करतो. आपल्या दर्शनविषयाचें वैभव तो आपल्या ठिकाणीं आणण्यासाठीं परिश्रम करतो, त्या वैभवशाली दर्शनविषयाशीं एकरूप होण्यासाठीं तो झटतो.

गी.नि. भा.२ प्र.६ -- निवड : अमल किरण. २ एप्रिल

 

२६. मन म्हणजे केवळ शांत वाहक बनावें

पूर्ण निर्दोष कृति व अनुभूति कशास म्हणावयाचें तें मानसिक किंवा प्राणिक पसंतीनें ठरवितां येत नाहीं; तें ठरतें तें स्फूर्तिदायक साक्षात्कारी आध्यात्मिक इच्छेची उपस्थिति या अनुभूतीमागें व कृतीमागें किती आहे यावरून ठरतें; ईश्वरी भक्ति प्रत्यक्ष वास्तव उपक्रम करते तो या आध्यात्मिक इच्छेच्या द्वारां करते. मला आदेश मिळतो तसें मी करतों.  (यथा प्रयुक्तोऽस्मि तथा करोमि ।) असे मी म्हणतो तेव्हांहि मर्यादा घालणारें वैयक्तिक तत्त्व व मानसिक प्रतिक्रिया माझ्या कृतींत आहे हें मी मान्य करीत असतों. परंतु ही कांहीं पूर्ण अवस्था नव्हे -- प्रभूनें आपलें काम माझ्या द्वारां, माझें साधन बनवून करावें ही पूर्ण अवस्था आहे. या अवस्थेंत माझ्या ठिकाणीं मानसिक किंवा दुसरी कोणतीहि पसंती ईश्वरी कृतीला मर्यादा घालणारी, तिच्यांत लुडबुड करणारी, तिच्यामध्यें दोष उत्पन्न करणारी असत नाहीं. या अवस्थेंत मन हें प्रकाशपूर्ण, शांत वाहक बनलेलें असतें; तें वाहक या नात्यानें अतिमानसिक सत्य प्रकट करीत असतें. हें सत्य साक्षात् करणारी व तें कार्यवाहीमध्यें आणणारी दिव्य इच्छा प्रकट करीत असतें. मन याप्रमाणें केवळ वाहक बनलें म्हणजेच त्याची कृति ही सर्वोच्च पुरुषाची व

पान क्र. २७


 

सत्याची कृति होऊं शकते. तें केवळ वाहक बनलें म्हणजेच त्याची कृति उच्चतम सत्याच्या कृतीचें सदोष रूपांतर किंवा विकृत रूपांतर होऊं शकत नाहीं. या उच्चतम सत्याच्या कृतींत कांहीं मर्यादा, कांहीं आवडनिवड, कांहीं विशेष संबंध अनुभवास आला, तर ईश्वरानें आपल्या व्यक्तिगत रूपावर ती मर्यादा वगैरे स्वत: होऊन लादली आहे असें समजावें; ती त्या क्षणापुरतीच आहे, ती त्याचें कांहीं प्रयोजन सिद्ध व्हावें म्हणून घातलेली आहे असें समजावें; ही मर्यादा वगैरे ईश्वराला बंधनकारक नसते, अंतिम नसते, मनानें आपल्या अज्ञानानें ठरविलेली अशी नसते. मन केवळ वाहक बनलें म्हणजे त्याचा विचार, त्याची इच्छा ही प्रकाशपूर्ण अनंताचा विचार, प्रकाशपूर्ण अनंताची इच्छा असते; अनंत आपल्या विचाराला व इच्छेला या विशिष्ट रूपाप्रमाणें दुसरीहि रूपें देऊं शकतें व देतें; प्रत्येक इच्छायुक्त विचार त्याच्या त्याच्या योग्य अशा जागीं अनंत बसवतें; अशा अनेक विचारांचें त्यावेळीं रूपांतर पण करतें; ईश्वरी ज्ञान व कृति यांचीं लहान रूपें प्रथम पुढें करून नंतर मोठीं व्यापक रूपें पण तें आपल्या कार्यासाठीं निर्माण करतें.

यो.स. आत्मपूर्णयोग प्र.१३ -- निवड : पवित्र. २ एप्रिल

 

२७. ज्ञानाच्या अधिष्ठानावर जीवन उभारा

तुमचा खरा आत्मा परमेश्वरच आहे, दुसऱ्या सर्व भूतांच्या आत्म्याशीं एकरूप असा आहे, परमेश्वराचा अंश आहे हें ज्ञान करून घ्या; त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर तुम्ही आपलें जीवन चालवा. आत्म्याच्या ठिकाणीं रहा. तुमच्या सर्वोत्तम आध्यात्मिक प्रकृतीच्या ठिकाणीं राहून जीवन चालवा, परमेश्वराशीं एकरूप होऊन जा, परमेश्वरसदृश होऊन रहा. तुम्हांमधील सर्वश्रेष्ठ एकच एक यज्ञभोक्ता, विश्वांतील सर्वश्रेष्ठ एकच

पान क्र. २८


 

एक जनभोक्ता जो परमेश्वर, त्याला तुमचीं सर्व कर्में प्रथम यज्ञांतील आहुति म्हणून अर्पण करा -- शेवटीं या परात्पर विश्वात्म्याच्या हातीं तुमचें सर्वच्या सर्व अस्तित्व आणि तुमचें सर्व कर्म द्या -- तुमच्या द्वारां त्याला त्याची इच्छा, त्याचें विविध कार्य विश्वांत करूं द्या. तुमच्यापुढें तुमच्या अस्तित्वाचा आणि कर्माचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचें हें उत्तर मीं तुम्हांपुढें ठेवीत आहे; या प्रश्नाला याखेरीज दुसरें समाधानकारक उत्तर नाहीं ही गोष्ट, तुम्ही हा प्रश्न सोडविण्याच्या पाठीमागें लागलांत म्हणजे तुमच्या शेवटीं प्रत्ययास येईल.

गी.नि. भा.२ प्र.२४ -- निवड : ललिता. २ एप्रिल

 

२८. अंतिम साक्षात्कारानें काय होईल ?

ज्ञानमार्गावर ईश्वराचे साक्षात्कार अनेक प्रकारचे घडतात; या साक्षात्कारांना देखील आम्हीं चिकटून रहातां कामा नये; सर्वथा सारभूत आणि पूर्ण असा ईश्वरी साक्षात्कार घडेतोंपर्यंत कोणत्याहि साक्षात्कारापाशीं आम्हीं थांबतां कामा नये. अगदीं अंतिम सर्वरूपाचा, अगदीं अंतिम सर्वातीताचा साक्षात्कार घडेपर्यन्त आम्हीं कोठेंहि थांबतां कामा नये. आमच्या आत्म्यानें याप्रमाणें आपलें स्वातंत्र्य वापरलें, तो वापरूं शकला, तर आम्हांला ईश्वराच्या कार्यांतील आश्चर्य प्रत्ययास येईल : आम्हांला हें प्रत्ययास येईल कीं, सर्व वस्तूंचा आम्हीं जो आंतरिक त्याग केला त्या त्यागानें आम्हीं कांहींहि गमावलें नाहीं. ''हें सर्व टाकून दिल्यानें तुला 'सर्वाचा' भोग घेतां येईल.'' आम्हांला हें प्रत्ययास येईल कीं, प्रत्येक वस्तु आमच्यासाठीं जपून ठेवली आहे, आणि ही जपून ठेवलेली प्रत्येक वस्तु आम्हांला पुन: दिलेली आहे; एवढेंच कीं, तींत आश्चर्यकारक बदल करून, तिचें आश्चर्यकारक रूपांतर करून मग ती पुन: आम्हांला दिलेली आहे; सर्वमंगल, सर्वसुंदर, सर्वप्रकाश, सर्वानंद

पान क्र. २९


 

ईश्वर हें तें प्रत्येक वस्तूचें महदाश्चर्यकारक रूपांतर होय. हा ईश्वर नित्यशुद्ध आहे, अनंत आहे; युगायुगांतील कधीं न उलगडणारें कायमचें रहस्य व आश्चर्य आहे.

यो.स. ज्ञानयोग प्र.५ -- निवड : दारा. ३ एप्रिल

 

२९. अवतार दिव्य व्यक्तिरूपांत का येतो ?

अवतार येतो तो मानवांत कनिष्ठ प्रकृतीच्या वर असलेली दिव्य, दैवी प्रकृति मानवाला प्रकट करण्याकरतां येतो. दिव्य कर्म म्हणजे काय तें मानवाला दाखवण्याकरतां येतो. खरें स्वतंत्र कर्म, अहंभावशून्य, निःस्वार्थी, निर्व्यक्तिक, विश्वस्पर्शी, दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम, दिव्य सामर्थ्य यांनीं परिपूर्ण असें खरें स्वतंत्र कर्म म्हणजेच दिव्य कर्म होय. अवतार येतो तो दिव्य व्यक्ति या स्वरूपांत येतो; या दिव्य व्यक्तित्वानें मानवाची जाणीव भरून जावी, त्याची मर्यादित अहंकारी व्यक्तिता या दिव्य व्यक्तित्वांत विलीन व्हावी, त्याचें व्यक्तित्व अहंकाराच्या कोंडींतून निघून मुक्त व्हावें, अनंत आणि विश्वव्यापी व्हावें, जन्माच्या या व्यापांतून सुटून अमर व्हावें यासाठीं अवतार हा दिव्य व्यक्तीच्या स्वरूपांत येत असतो. अवतार येतो तो दिव्य सामर्थ्य आणि दिव्य प्रेम या स्वरूपांत येतो. हे गुण मानवांना आकर्षित करतात; या गुणांचा आश्रय मानवांनीं करावा, मानवांनीं आपल्या असमर्थ इच्छाशक्तीचा आश्रय टाकून द्यावा, आपलें मानवसुलभ भय, क्रोध, काम यांच्या संघर्षांतून आपलें अंग काढून घ्यावें, आपल्या अशांतीच्या आणि दुःखाच्या जीवनांतून मोकळें व्हावें आणि ईश्वराच्या शांतीनें आणि आनंदानें भरलेलें जीवन आत्मसात् करावें यासाठीं दिव्य सामर्थ्य, प्रेम यांचें मूर्त स्वरूपच असा अवतार मानवसमाजांत प्रकट होतो.

गी.नि. भा.१ प्र.१७ -- निवड : अमृता. ४ एप्रिल

पान क्र. ३०


 

३०. मानवाचीच विशेष निवड

सतत उंच उंच चढण्यास आवाहन करणाऱ्या उच्चतम शिखराकडे निघालेला यात्रेकरू हें माणसाचें स्वरूप आहे. त्याच्या जीवनाचें सारतत्त्व आहे, सतत आत्म-निर्मिति आणि सतत आत्म-अतिक्रमण. आजचें त्याचें स्वरूप असें आहे कीं त्यांतून अधिक उच्च असें कांहींतरी प्रकट व्हावयाचें आहे. असें आहे म्हणूनच मानवाची निवड या साहसकार्यासाठीं झालेली दिसत आहे. सतत उच्च उच्च जात रहाण्याची आकांक्षा बाळगण्यांतच त्याची वीरता आहे, खरी थोरवी आहे, सुयोग्य व भरीव, भक्कम तपस्विता आहे. अधिक उंच व अधिक व्यापक ध्येयाचा व त्याकडे नेणाऱ्या मार्गाचा शोध घेत रहाण्यासाठीं त्याला संकीर्ण व ऊर्ध्वगामी ज्ञानशक्ति बहाल करण्यांत आलेली आहे. त्या मार्गावर अधिकाधिक परिश्रमपूर्वक व कशानेंहि न कचरतां पुढें पुढें अग्रेसर होण्यासाठींच त्याला संकल्पबळ व असीम अभीप्सा प्रदान करण्यांत आलेली आहे. त्याचा अंतरात्मा आहे विश्वव्यापी आनंदानें परिपूर्ण. तो मानवाच्या चेतनेंत अधिक अधिक विशालता आणणारा आहे. संकल्पबळ आणि क्षमता यांचा अक्षय्य खजिना त्याच्यापाशीं आहे. अमर्याद अस्तित्वाचें विशालत्व त्याच्या ठिकाणीं आहे. या सर्वांच्या द्वारां तो मानवाला त्याच्या महान् यात्रेस पाठिंबा देत आहे, आधार देत आहे. अंतरात्म्याच्या भोंवतालचीं आवरणें जेव्हां माणूस फाडून दूर करतो, जेव्हां त्याला भगवद्दर्शन होतें आणि मग आंतरिक भगवत्शक्तीच्या हातीं आपली सारी निम्न प्रकृति तो सोंपवितो तेव्हां, जें जें पूर्वीं अशक्यप्राय होतें तें तें आतां सहजसाध्य व एकमेव नियतीच्या स्वरूपाचें झालें आहे असें त्याला समजून येतें. त्याची अनाकलनीय कष्टसाध्य यात्रा ही प्रकाशमय स्तरावरील अधिक वेगवान् आरोहण ठरतें; आणि ती अशा शिखरावर पोंचते कीं जें वरवरच्या भासमान मानवतेच्या अंतिम परिपूर्ति-रूप असतें. खऱ्या दिव्य मानवाचा शोध,

पान क्र. ३१


 

बोध व प्राप्ति म्हणजे, अतिमानवत्वाचीच ती प्राप्ति असते.

'आर्य' - दिव्य जीवन - अखेरचा परिच्छेद -- निवड : पुरुषोत्तम. ४ एप्रिल

 

३१. पूर्ण आत्मसमर्पणाची निकड

अगदीं संपूर्ण अंतःकरणपूर्वक आणि तुमच्या सर्व शक्तींनिशीं स्वतःला ईश्वराच्या हातीं देऊन टाका. या बाबतींत कसल्याहि अटी नकोत, कसलीहि अपेक्षा नको; योगसाधनेंत सिद्धि लाभावी ही देखील अपेक्षा नको. अपेक्षा असायचीच असेल, तर एवढीच कीं, जी आणि जशी ईश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणें प्रत्यक्षपणें जें घडून यायचें असेल तें तुमच्यामध्यें व तुमच्याद्वारां घडून येवो. त्याव्यतिरिक्त अन्य कांहीं नको. ईश्वरानें अमुक तमुक द्यावें अशी मागणी असेल, तर ती ईश्वर पूर्ण करतोच, पण जे कोणी कांहींहि अपेक्षा न ठेवतां ईश्वरास स्वतःचें समग्र समर्पण करून टाकतात त्यांना, जें त्यांनीं कदाचित् मागितलें असतें वा ज्याची ज्याची त्यांना गरज भासली असती तें तें प्रत्येक, त्यांना तो देऊन टाकत असतो; एवढेंच नव्हे, तर त्याबरोबरच ईश्वर स्वतःलाच त्यांना देऊन टाकून वर त्यांत स्वतःच्या दिव्य प्रेमाच्या उत्स्फूर्त वरदानाची भर घालतो.

योग व त्याचे उद्देश -- निवड : दत्ता. ५ एप्रिल

 

३२. ज्ञानास मूल्य केव्हां येतें ?

नुसतें जाणलें म्हणजे ज्ञानाची परिसमाप्ति झाली असें नाहीं; किंवा केवळ जाणण्यासाठींच त्याच्या मागें लागून त्याची प्राप्ति करून घ्यायची असें नाहीं. ज्ञानाला त्याचें खरें मूल्य तेव्हांच लाभतें, जेव्हां तें स्वतःपेक्षां अधिक मौल्यवान् अशा आत्मधनाच्या प्राप्तीकडे माणसास नेईल.

पान क्र. ३२


 

शाश्वत सत्य नुसतें जाणावयाचें आणि तरीहि दुःख, संघर्ष आणि आपल्या या वर्तमान जीवनसरणींतील निकृष्टता तशीच राहूं देऊन येथें पिचत रहावयाचें याचा काय उपयोग ? हा तर अगदींच निकृष्ट दर्जाचा व अगदींच लुळापांगळा असा लाभ म्हणावा लागेल.

उच्चतर ज्ञान नेहमीं नवीन संभाव्यता निर्माण करतें; आणि तें ज्ञान जर खरोखरीच आत्मसात् केलें गेलेलें असेल, तर अधिक उच्च जीवनांत त्याची परिणति होते.

ब्रह्मज्ञान्याला ज्ञानप्रकाशाचा नुसता आनंदच तेवढा लाभतो असें नव्हे, तर त्याच्या ज्ञानाचा परिणाम म्हणून त्याला अधिक समृद्ध असें कांहींतरी लाभतें. ब्रह्मविद् आप्नोति ।

त्याला जें कांहीं उच्चतम लाभतें, तें श्रेष्ठतमहि असतें. त्याला उच्चतम जीवनाचा लाभ होतो, उच्चतम चेतना, जीवनाची उच्चतम विशालता आणि शक्ति आणि अत्युच्च आनंद या सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ गोष्टी प्राप्त होतात. ब्रह्मविद् आप्नोति परम् ।

'आर्य' खं.५ 'ब्रह्मज्ञान' -- निवड : श्रीमाताजी. ३ एप्रिल

 

३३. अहंचा प्रभूच्या ठिकाणीं विलय

मानवी 'मी'ला जेव्हां हें कळतें कीं, त्याची इच्छा ही त्याच्या ज्येष्ठ आत्म्याचें एक साधन आहे, त्याचें शहाणपण म्हणजे अज्ञान व बालिशता आहे, त्याचें सामर्थ्य हें लहान बाळाचें चांचपडणें आहे, त्याचा सद्‌गुण हा ढोंगी दुर्गुण आहे, आणि हें कळून हा 'मी' जेव्हां त्याच्या पलीकडे असलेल्या ज्येष्ठ तत्त्वाच्या हातीं स्वतःला सोपवितो तेव्हां तो तरतो, तेव्हां तो मुक्त होतो. आमच्या वैयक्तिक अस्मितेविषयीं आणि तिची स्वतंत्रता व स्वमताग्रह यांविषयीं आम्हांला भारी आसक्ति असते; परंतु या दर्शनी स्वतंत्रतेच्या व स्वमताच्या पोटांत अतीव

पान क्र. ३३


 

करुणास्पद असें दास्य लपलेलें असतें; हजारों ऊर्मींचें, प्रेरणांचें, शक्तींचें दास्य, ही आमची दर्शनी स्वतंत्र अस्मिता करीत असते; आमची अस्मिता लहान, संकुचित करून या शक्तींना आम्हींच बाह्य शक्ति बनविलेल्या असतात. आमचा अहंभाव, स्वतंत्रतेचा गर्व वहाणारा आमचा अहंभाव प्रतिक्षणीं विश्वप्रकृतीच्या क्षेत्रांतील अगण्य प्राण्यांचा, शक्तींचा, प्रभावांचा गुलाम असतो, खेळणें असतो, बाहुलें असतो. प्रभूच्या ठिकाणीं स्वतःचा विलय करणें, यांतच अहंभावाची परिपूर्ति आहे; स्वतःहून श्रेष्ठ असलेल्या तत्त्वाच्या हातीं स्वतःचें समर्पण करणें यांतच 'अहं'ची त्याच्या बंधनामधून मुक्तता आहे, यांतच त्याचें पूर्ण स्वातंत्र्य आहे.

यो.स. साधनचतुष्टय -- निवड : अमल किरण. ७ एप्रिल

 

३४. साधकानें धीरोदात्त असावें.

तुमचा आध्यात्मिक उत्कर्ष साधला जावा म्हणून सर्वशक्तिमान् भगवान्, प्रेम आणि ज्ञान यांची उपयोजना करीत आहे. अति दीर्घ काळ लोटत आहे, लोटला आहे, असें वाटलें तरीदेखील त्यामुळें केव्हांहि त्रस्त होण्याचें कारण नाहीं. तथापि जेव्हां केव्हां सदोषता आणि अडथळे उत्पन्न होतात, तेव्हां अप्रमत्त राहिलें पाहिजे, धीर धरला पाहिजे, उत्साह राखला पाहिजे; आणि मग बाकीचें ईश्वराचें काम. तें त्याच्यावर सोंपवून मोकळें झालें पाहिजे. कोणत्याहि कार्याला काळ हा लागतोच. तुमच्यामध्यें एक प्रचंड कार्य चाललेलें आहे. तुमच्या समग्र स्वभावाचें, मानुषी स्वभावाचें दिव्य स्वभावांत परिवर्तन घडवून आणण्याचें तें कार्य आहे. शतकानुशतकें चालणारा विकास कांहीं वर्षांत बलपूर्वक घडविण्याचें तें कार्य आहे. म्हणून काळ फार लागतो अशी खळखळ करणें कामीं येणार नाहीं .... मनुष्यानें घालून दिलेले साधनमार्ग हे

पान क्र. ३४


 

मनुष्यानें स्वबुद्धिचातुर्यानें खोदलेल्या कालच्यासारखे असतात; त्यांतून प्रवास करणें सुलभतेचें असतें, सुरक्षित असतें, खात्रीचें असतें. पण प्रवास करतां येतो तो मात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंतच. पण तसा हा समर्पणाचा साधनमार्ग नाहीं. तो एखाद्या महासागरासारखा विस्तृत, पर्यटनास उपयुक्त अशा खाणा-खुणा नसलेला असा आहे, आणि म्हणूनच त्यांत अनिर्बंध प्रवास करतां येईल, सर्व स्थळें पाहतां येतील व अमर्याद स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा असेल.

योग व त्याचे उद्देश -- निवड : दत्ता. ७ एप्रिल

 

३५. अभीप्सेचा अग्नि

हा आहे आपल्या यज्ञाचा अग्नि ! त्याच्या ज्वाला शक्य तितक्या उंच पोंचाव्या म्हणून त्याला प्रज्वलित करण्याचें बल आमच्या ठायीं वसूं दे, त्यायोगें आमचे विचार पूर्णत्व पावूं देत. जें जें कांहीं आपणांस देणें आहे तें सर्व देवांकरितां अन्न बनावें यासाठीं या अग्नींत टाकावें; ही आहुति, आपण इच्छा करीत आहोंत त्या अनंत चेतनेच्या देवतांना आमच्याप्रत आणील.

आपण त्याच्यासाठीं इंधन गोळा करूं या, त्याच्यासाठीं अर्पण करण्यासाठीं वस्तू बनवूं या....

हे भगवन्, तुझी मुखें सर्वत्र आहेत ! तुझ्या सत्तेनें तूं आम्हांला सर्व बाजूंनीं वेढून टाकतोस. आमच्यांतील पाप जाळून टाक.

आमचा शत्रु जिकडे वळेल, तिकडे तुझ्याकडून प्रतिकार होऊं दे. भयानक जलपृष्ठावरून जात असलेल्या नावेंतून तूं आम्हांस पार कर. आमच्यांतील पाप जाळून टाक....

समुद्रावर जसा तुझ्या नावेंत आसरा, तसाच आम्हांला तुझ्या परमानंदांत विसांवा दे.

पान क्र. ३५


 

टीप : पाप म्हणजे ती गोष्ट, जी मानवी शक्तींना चेतवून घाईघाईनें ओढीत नेते आणि सन्मार्गच्युति घडविते. असा एक सरळ मार्ग आहे कीं जेथें व ज्या मार्गावर प्रकाश स्वभावत: वाढत जातो, सत्य स्वभावतःच अधिकाधिक दिसत जातें. अनंत भूमिकांवरून, अनंत देखाव्यांकडे हा मार्ग नेत असतो; आमच्या प्रकृतीचा धर्म सामान्यत: या सरळ मार्गानें आम्हांला आमच्या कृतार्थतेकडे, परिपूर्णतेकडे घेऊन जात असतो. पाप या मार्गानें आम्हांला जाऊं न देतां, वांकड्यातिकड्या अनेक वळणांच्या आड मार्गानें आम्हांला जावयास लावतें. या मार्गांत जिकडेतिकडे खांचा व खळगे असतात, कोंडवाडे असतात; आम्हांला ठेंचाळत, पडतझडत या आडमार्गानें पाप जावयास लावतें.

'आर्य', वैदिक अग्नि -- निवड. नलिनीकांत. ९ एप्रिल

 

३६. वासनेचा त्याग ही पहिली गरज

आध्यात्मिक पूर्णतेचा प्रमुख वैरी वासनाच आहे.... म्हणून वासनेचा नाश करा. कोणत्याहि गोष्टींच्या बाह्य रूपांचा योग किंवा भोग यांसंबंधींची आसक्ति, ओढ मनांतून काढून टाका. तुम्ही स्वतःला, बाह्य स्पर्शांपासून, आकर्षणांपासून, मनाच्या व इंद्रियांच्या बाह्य विषयांपासून दूर ठेवा, अलिप्त ठेवा. तीव्र कामनांचा हल्ला तुमच्यावर होईल तो धैर्यानें तोंड देऊन परतवून लावा. तुमच्या अंतरात्म्यांत भक्कम आसन घालून बसून रहा. कामना तुमच्या इंद्रियांच्या, अंगांच्या ठिकाणीं धुडगूस घालीत असतांना, त्यांचें कांहींहि न ऐकतां अंतरात्म्यांत भक्कम ठाण मांडून अलिप्तपणें बसून रहात जा.... असें केल्यानें शेवटीं तुमच्या प्रकृतीच्या कोणत्याहि अंगाला कामनांचा ताप होत नाहीं अशी अवस्था तुम्हांला येईल. सुखाचे आणि दुःखाचे जोरदार हल्ले आणि मोह पाडणारे अल्पाल्प स्पर्श देखील तीव्र कामनांच्या हल्ल्यांप्रमाणें सोशीत

पान क्र. ३६


 

जा व परतवीत जा. आवड व नावड, राग व द्वेष, प्रिय व अप्रिय दुरून टाळण्याची किंवा दूर ढकलून देण्याची वृत्ति तुमच्या मनांतून पार काढून टाका, नष्ट करून टाका, समूळ उपटून फेंकून द्या. या वृत्तीकडे शांत तटस्थतेनें बघत रहा. तुमच्या प्रकृतींतील सर्व वासना-विषयांकडे या वृत्तीप्रमाणेंच तटस्थतेनें बघत राहून आपली शांति कायम ठेवीत जा. निर्व्यक्तिक अहंशून्य आत्म्याच्या निःशब्द निश्चल शांतीनें या विषयांकडे व वृत्तींकडे बघत जा.

असें केल्यानें तुमच्या ठिकाणीं पूर्ण समदृष्टि येईल. अचल शांतीचें सामर्थ्य येईल. अशी शांति व समता धारण करून स्वतःच्या निर्मितीकडे विश्वपुरुष बघत असतो. तुमच्या वांट्याला जें कांहीं येईल, त्याकडे अशाच समदृष्टीनें बघावयास शिका. समान भावनेनें, सम बुद्धीनें त्याचें स्वागत करावयास शिका. यश व अपयश, मान व अपमान, लोकमान्यता, लोकप्रेम आणि लोकांकडून होणारा तिरस्कार, छळ, द्वेष हे सर्व समबुद्धीनें, समभावनेनें स्वीकारावयास शिका. इतर लोकांना सुखद होणारी घटना, त्यांना दुःखद होणारी घटना -- अशी प्रत्येक घटना तुम्ही समबुद्धीनें पहाण्यास शिका. सुष्ट आणि दुष्ट, शहाणे आणि मूर्ख, ब्राह्मण आणि चांडाळ, सर्वोत्तम मनुष्य आणि क्षुद्रांत क्षुद्र प्राणी या सर्वांकडे समदृष्टीनें बघावयास शिका. सर्व माणसांना, त्यांच्याशीं तुमचें नातें कोणतेंहि असो, समतेनें वागवा, तुमचा मित्र व सहकारी, तुमच्याशीं तटस्थतेनें वागणारा वा उपेक्षेनें वागणारा, तुमचा विरोधक आणि शत्रु, तुमच्यावर प्रेम करणारा आणि तुमचा द्वेष करणारा या सर्वांना समतेनें वागविण्यास शिका. हीं सर्व भिन्न नातीं 'अहं'चीं असतात; आणि अहंच्या बंधनांतून तुम्हांला मोकळें व्हावयाचें आहे. हीं सर्व नातीं व्यक्तीला असतात; आणि निर्व्यक्तिक चैतन्याच्या खोल दृष्टीनें तुम्हांला सर्वांकडे पहावयाचें आहे. हे जे भेद वर सांगितले, ते व्यक्तिगत म्हणजे व्यक्तिभेदानुसार होणारे आहेत, कालभेदानुसार होणारे

पान क्र. ३७


 

आहेत. तुम्हांला हे भेद लक्षांत घेणें अगत्याचें आहे, पण या भेदांचा परिणाम तुम्हीं स्वतःवर होऊं देणें तुमच्या उच्च आकांक्षेच्या दृष्टीनें चूक होईल. या भेदांवर तुम्हीं जोर देतां उपयोगी नाहीं. सर्वांमध्यें जें एकच तत्त्व आहे, सर्व ज्या एकाच आत्म्याचीं भिन्न रूपें आहेत, प्रत्येक प्राण्यामध्यें जें एकच ईश्वरस्वरूप आहे, त्यावर तुम्हांला आपलें लक्ष केंद्रित करावयास हवें. माणसें, पदार्थ, शक्ति, घटना सर्व प्रकारचा प्रयत्न, त्याचा परिणाम, जगाच्या धडपडीचा कोणताहि परिणाम यांत जें कार्य ईश्वराच्या समदृष्टीला, समान संकल्पाला अनुसरून प्रकृति करीत आहे, त्या प्रकृतीच्या कार्यावर तुम्हांला आपलें लक्ष केंद्रित करावयास हवें.

गी.नि. प्र.अखेरचें -- निवड : श्रीमाताजी. १० एप्रिल

 

३७. तमोगुणापासून धोका

तमोगुणापासून धोका दोन प्रकारचा : एक म्हणजे जेव्हां पुरुष [आत्मा] स्वतःच्या ठिकाणच्या तमोगुणाशीं एकरूप पावून, 'मी दुबळा आहे, पापी आहे, दैन्यवाणा आहे, अडाणी आहे, निकामी आहे, अमुक एका व्यक्तीपेक्षां कमी आहे किंवा तमुक एका व्यक्तीपेक्षां हीन आहे, अधम आहे; मग ईश्वर तरी माझ्याद्वारां काय करणार ?' अशी विचारसरणी स्वीकारतो. याचाच अर्थ, ज्या साधनांचा ईश्वराला उपयोग करावयाचा असतो, त्याच्या तात्पुरत्या क्षमता अथवा अक्षमता यांनींच ईश्वराची शक्ति मर्यादित झालेली आहे आणि मुक्या मनुष्याला बोलका करण्याचें आणि लंगड्याला डोंगर ओलांडावयास लावण्याचें सामर्थ्य ईश्वराजवळ नाहींच, मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिम् । हें खरें नव्हे, असेंच म्हणण्यासारखें तें असतें. दुसरा धोका म्हणजे हा : साधनेमध्यें कधीं कधीं अभावात्मक शांतीचा, कर्मापासून परावृत्त

पान क्र. ३८


 

करणाऱ्या शांतीचा अनुभव आल्यानें फार मोठ्या प्रमाणांत मुक्त झाल्यासारखें, कसलेंहि बंधन उरलें नसल्यासारखें वाटतें आणि सर्व त्रासांतून मोकळें झालों असें वाटून, तो शान्तीची प्राप्ति अनुभवीत, जीवनापासून व जीवनांतील सर्व कर्मापासून परावृत्त होतो; शान्ति व क्रियाशून्य रहाण्यांतील सुकरता यांतच गुंतून पडतो. नित्य ध्यानांत असूं द्या कीं, तुम्ही देखील ब्रह्म आहांत आणि तुमच्यामधून भगवत् शक्ति कार्य करीत आहे. ईश्वराच्या सर्वशक्तिमत्त्वाचा आणि सकल विश्वांत चालत असलेल्या लीलेंत ईश्वर घेत असलेल्या आनंदाचा साक्षात्कार घेण्याच्या नित्य प्रयत्नांत रहा.

योग व त्याचे उद्देश -- निवड : दत्ता. १० एप्रिल

 

३८. ज्यांना समर्पण साधलें

अगदीं सुरुवातीपासूनच ज्यांना संपूर्ण समर्पण करतां येतें, त्यांच्या बाबतींत कसलाच प्रश्र नसतो. त्यांची योगयात्रा, साधनेंतील विकास अगदीं जलद गतीनें व सुलभ रीतीनें होत राहतो.

योग व त्याचे उद्देश -- निवड : श्रीमाताजी. १० एप्रिल

 

३९. वस्तुमात्राचें सत्य

वस्तुमात्राचें सत्य वस्तूंच्या खोल शांत भागामध्यें असतें. वस्तूंच्या पृष्ठभागावर ज्या सारख्या बदलणाऱ्या लहरी लहरतात, त्या लहरींत नसतें. सर्वश्रेष्ठ जाणीवयुक्त पुरुष (ईश्वर) आपलें दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प, दिव्य शक्ति, दिव्य प्रेम उपयोगांत आणून वस्तूंचा विकास आपल्या हुकमतीखालीं घडवून आणीत असतो; आमच्या अज्ञानाला, हें विकासकार्य पुष्कळ वेळां क्रूर गोंधळानें आणि अनौचित्यानें भरलेलें

पान क्र. ३९


 

दिसतें. हा विकास घडवितांना तो पुरुष खोल असलेल्या वस्तुस्थितीकडे लक्ष देत असतो. पृष्ठवर्ती गोष्टींच्या आरडाओरडीनें तो आपला कार्यक्रम बदलीत नाहीं.

यो.स. -- समतेचें पूर्णत्व -- निवड : चिन्मयी. ११ एप्रिल

 

४०. अहंकारत्याग व त्याचें फल

योगप्रक्रियेंत मानवी आत्मा, वस्तूंच्या बाह्य आकारांत व आकर्षणांत बुडालेल्या अहंप्रधान जाणिवेंतून बाहेर पडून, एका उच्च अवस्थेच्या दिशेनें चालूं लागतो. या अवस्थेंत विश्वातीत आणि विश्वरूप असलेलें तत्त्व व्यक्तीच्या रूपांत उतरून त्या रूपांत परिवर्तन घडवून आणूं शकतें. तेव्हां, या आत्म्याला अन्तर्मुख करणारी शक्ति किती बलवान् आहे, त्याला अहंभावांतून बाहेर काढणारी आकांक्षा किती तीव्र आहे, याजवर, त्याला काय सिद्धि मिळणार हें प्रथमत: अवलंबून राहतें. साधकाच्या हृदयांतील आकांक्षेचा जोर, त्याची इच्छाशक्ति, त्याच्या मनाची एकाग्रता, त्याच्या परिश्रमाची निश्चयात्मक चिकाटी त्याच्या अहंतात्यागाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आदर्श साधकाला बायबलच्या भाषेंत असें म्हणतां आलें पाहिजे कीं, 'प्रभूविषयींच्या उत्साहानें मला, माझ्या अहंकाराला खाऊन टाकलें आहे.' प्रभूसंबंधाचा साधकाचा  'उत्साह', साधकाच्या प्रकृतीची, प्रभूच्या भेटीमुळें घडून येणाऱ्या दिव्य गोष्टींचा अनुभव घेण्याविषयींची 'व्याकुळता', प्रभूच्या भेटीसाठीं साधकाच्या हृदयाची होणारी तळमळ ही साधकाचा अहंकार खाऊन टाकते. त्याच्या अहंभावाच्या क्षुद्र, संकुचित सांच्यांची, त्याच्या भिंतींची मोडतोड करून साधकाच्या अंतरांतील जागा ऐसपैस मोकळी करते; आणि याप्रमाणें ज्याच्या भेटीसाठीं तळमळ चाललेली आहे त्याच्या पूर्ण, भव्य स्वागताची तयारी साधकाचें हृदय, त्याची प्रकृति करते....

पान क्र. ४०


 

जोंपर्यंत प्रभूशीं संपर्क बराचसा प्रस्थापित झाला नाहीं, जोपर्यंत बऱ्याच प्रमाणांत प्रभूशीं एकरूपता (सायुज्य) प्रस्थापित झाली नाहीं, तोंपर्यंत वैयक्तिक परिश्रम सामान्यतः पुष्कळच करावे लागतात. संपर्क नीट प्रस्थापित झाला, सायुज्य नीट प्रस्थापित झालें म्हणजे त्या प्रमाणांत साधकाला ही जाणीव होऊं लागते कीं, त्याच्या ठिकाणीं, त्याची नव्हे अशी शक्ति, त्याच्या अहंनिष्ठ शक्तीच्या व खटाटोपाच्या पलीकडील शक्ति काम करूं लागली आहे. ही जाणीव साधकाला आल्यावर तो क्रमाक्रमानें या अहं-अतीत शक्तीच्या हातीं स्वतःला देतो, तो क्रमाक्रमानें आपल्या योगाची अवस्थाहि या शक्तीच्या हातीं सोंपवितो. शेवटीं त्याची स्वतःची इच्छा व शक्ति त्या ज्येष्ठ शक्तीशीं एकरूप होतात; तो आपली इच्छा व शक्ति प्रभूच्या इच्छेंत आणि तिच्या सर्वातीत सर्वरूप सामर्थ्यांत विलीन करतो. मग त्याला असें दिसतें कीं, त्याच्या मानसिक, प्राणिक, शारीरिक अस्तित्वाचें आवश्यक परिवर्तन प्रभूची इच्छा स्वतःच्या नजरेखालीं घडवून आणीत आहे; या परिवर्तनाच्या कार्यांत, हांवऱ्या स्वार्थैकनिष्ठ अशा 'मी'ला शक्य नसलेली निष्पक्षपाती विवेकिता व दूरदृष्टीची कार्यक्षमता प्रभु कामीं लावीत आहे असेंहि त्याच्या प्रत्ययास येतें. साधक प्रभूशीं पूर्ण एकरूप झाला, त्यानें आपला आत्मा प्रभूच्या ठिकाणीं पूर्णपणें तल्लीन केला, म्हणजे तो साधक जगांतील ईश्वरी कार्याचें एक केंद्र बनला असें होतें. हें केंद्र विशुद्ध, मुक्त, मार्दवयुक्त, प्रकाशमय असल्यानें तें प्रभूच्या प्रत्यक्ष कार्याचें साधन म्हणून उपयोगी पडूं लागतें. हें प्रत्यक्ष कार्य जें प्रभु करूं लागतो, तें लहान वैयक्तिक योगाचें कार्य नसून महान् योगाचें, मानवतेच्या योगाचें, अतिमानवतेच्या योगाचें, पृथ्वीच्या परिवर्तनविषयक योगाचें, तिच्या आध्यात्मिक प्रगतिविषयक योगाचें कार्य असतें.

यो.स. साधनचतुष्टय -- निवड : अमल किरण. ११ एप्रिल

पान क्र. ४१


 

४१. समत्वसंपादनाचा त्रिविध कार्यक्रम

अक्रिय, किंवा केवळ स्वीकारात्मक समत्व संपादन करण्यासाठीं जो प्रयत्न, कार्यक्रम करावयाचा तो तीन भिन्न तत्त्वांपासून किंवा वृत्तींपासून सुरू होऊं शकतो : या तीनहि वृत्तींतून एकच परिणाम (स्वीकारात्मक समत्व) निघूं शकतो -- या तीन वृत्ती म्हणजे सहिष्णुता, तटस्थता, आणि शरणागति या वृत्ती होत.

... सामान्य प्रतिक्रियांवर प्रभुत्व मिळविणाऱ्या आत्म्याचा तिसरा मार्ग (पहिला मार्ग सहिष्णुता, दुसरा मार्ग तटस्थता) शरणागतीचा आहे. ईश्वराच्या इच्छेला शरण जावें व या शरणागतीच्या पायावर येईल तो प्रसंग शांतीनें निभावून न्यावा असा उपदेश ख्रिस्तानें केला होता; या उपदेशांतील शरणागतीचा मार्ग हा तिसरा मार्ग होऊं शकतो : विश्वपुरुषाची इच्छा कालात्मक विश्वांत विविध वस्तूंच्या व घटनांच्या रूपानें व्यक्त होते हें जाणून, असतील त्या वस्तूंचें व घटनांचें, अहंकारत्यागपूर्वक स्वागत करणें हें तिसऱ्या मार्गाचें स्वरूप असूं शकेल; ईश्वराला, पुरुषोत्तमाला स्वत: पूर्णपणें शरण जाणें हें या तिसऱ्या मार्गाचें स्वरूप असूं शकेल. पहिला मार्ग हा इच्छाशक्तीचा मार्ग होता, दुसरा मार्ग ज्ञानाचा मार्ग होता, विवेचक बुद्धीचा मार्ग होता; हा तिसरा मार्ग स्वाभाविक प्रवृत्तीचा व हृदयाचा मार्ग आहे, भक्तीच्या तत्त्वाशीं हा मार्ग जिव्हाळ्याचे संबंध राखतो; हा मार्ग शेवटपर्यंत आम्ही चालत राहिलों, तर पूर्ण समत्व हाच परिणाम शेवटीं आम्हांला पहाण्यास मिळतो, कारण अहंकाराची गांठ या मार्गांत सैल केली जाते, वैयक्तिक मागणी, मागणें या मार्गांत बंद होतें; असें आम्हांला आढळून येतें कीं, सुखद वस्तूंत सुख मानावयास आपण बांधले गेलेलों नाहीं, दुःखद वस्तूंच्या संपर्कानें दुःखी होण्यास आम्ही बांधले गेलेलों नाहीं. आम्ही या साक्षात्कारानंतर सुखद दुःखद गोष्टी उत्कंठेनें जवळ करीत नाहीं किंवा त्रासानें दूर करीत नाहीं. आम्ही त्या शांतपणें सहन करतों, आमच्या

पान क्र. ४२


 

अस्तित्वाचा जो धनी त्याजकडे या गोष्टी आम्ही सोंपवितों. या गोष्टींचे वैयक्तिक परिणाम काय आहेत इकडे आम्ही कमी कमी लक्ष देत जातो; आम्ही मग एकच गोष्ट महत्त्वाची समजतों. ही गोष्ट म्हणजे ईश्वराच्या दिशेनें जाणें, ईश्वराच्या सन्निध जाणें, विश्वव्यापी अनंत पुरुषाच्या सन्निध जाणें, त्याशीं समरस होणें, ईश्वराशीं एकरूप होणें, त्याचें वाहन होणें, त्याचें साधन होणें, त्याचे सेवक होणें, त्याच्यावर प्रेम करणें, त्याच्या उपस्थितींत आनंदमय होणें, त्याच्याशीं नातें जोडून आनंदमय होणें, सुखदुःखाचा दुसरा कोणताहि विषय न ठेवणें, सुखदुःखाचें दुसरें कोणतेंहि कारण न ठेवणें.

यो.स. समतेचा मार्ग, प्रकरण १२ वें -- निवड : दारा. १२ एप्रिल

 

४२. कोणतीहि कला मुक्तिप्रद असावी

कोणतीहि कला ही अशी वस्तु असली पाहिजे, कीं जी सुसंवाद, आनंद व प्रकाश आहे. आत्म्याची प्राणिक आकुल-व्याकुलता आणि संघर्ष यांकडे दुर्लक्ष करून नव्हे, तर व्यक्तीला आंतर आत्मतत्त्वाच्या बलसंपन्नतेंत, आंतर-प्रकाशांत आणि अधिक विशाल व व्यापक दृष्टि देणाऱ्या वायुमंडलांत वर उचलून, यांतून सुटण्याची नुसती वाटच दाखविणारी नव्हे, तर सर्वाधार शांति व सुप्रतिष्ठित ज्ञानाची शक्ति, प्रभुत्व आणि मुक्ति प्रदान करणारी ती वस्तु असली पाहिजे.

'भावी काव्य' -- निवड : श्रीमाताजी. १२ एप्रिल

 

४३. समाधीची खरी कसोटी

समाधींत गेलेल्या माणसाची पदार्थविषयक, परिस्थितिविषयक जाणीव नष्ट होते, तो आपल्या शारीर आणि मानसिक आत्म्याला पारखा

पान क्र. ४३


 

होतो, त्याच्या शरीराला भाजलें किंवा अन्य तऱ्हेनें जखमा केल्या, तरी तो शरीरांत किंवा मनांत परत येत नाहीं अशी सामान्यत: कल्पना असते. ही अशी गाढ तंद्री, समाधीची एक विशिष्ट सखोल अवस्था दाखविते, पण ही कांहीं सखोल समाधीची अटळ आवश्यक खूण नव्हे. अशा समाधीची खरी कसोटी, गीतेनुसार, पुढीलप्रमाणें असते : सर्व वासनांची हकालपट्टी, मनावर पकड ठेवण्याची वा पकड करण्याची कोणत्याहि वासनांची असमर्थता -- ही खरी कसोटी असते. ही वासनामुक्ति निर्माण करणारी आंतरिक अवस्था, सर्वथा अंतर्मुख स्वान्तस्थ झालेल्या आत्म्याचा आत्मानंद; बाह्य जीवनामधील आकर्षक आणि घृणास्पद गोष्टी, सुखद सूर्यप्रकाश आणि दुःखद वादळ यांची आळीपाळीनें होणारी बाह्य जीवनांतील आवर्तनें यांजपासून दूर उंचीवर राहूं लागलेल्या उद्-आसीन, शांत, समतासंपन्न मनाची जोड; ही खरी कसोटी असते. समाधिस्थ मन बाह्य जगांत वावरतांना देखील अंतर्मुख असतें, तें बाहेरच्या गोष्टी न्याहाळीत असतांहि आत्म्याच्या ठिकाणीं एकाग्र असतें. दुसऱ्यांना बाह्य दृष्टीनें हें मन जगांतील व्यवहारांत गुंतलेलें दिसलें, तरी तें वस्तुत: दिव्य आत्म्याच्या ठिकाणीं सर्वभावानें स्थिर झालेलें असतें.

गी.नि. प्र.१०वें -- निवड : सत्येन. १८ एप्रिल

 

४४. मनुष्य पूर्ण व्हावयाचा तर -

मनुष्य पूर्ण व्हावयाचा तर त्यानें ब्रह्माची परम शांति आणि अनासक्ति आपल्या हृदयांत सुप्रतिष्ठित करावयास हवी आणि आपल्या अविश्रांत स्वयंस्फूर्त श्रमांना या शांतीचा आणि अनासक्तीचा आधार द्यावयास हवा. त्याचप्रमाणें ब्रह्माची दिव्य सहिष्णुता व त्याचा दिव्य संतोष मनुष्याच्या अनासक्त परिश्रमांत व्यक्त व्हावयाला हवा. या प्रकारची पूर्णता ज्यांनीं मिळविली आहे, ज्यांच्या हृदयांत ब्रह्माची

पान क्र. ४४


 

(ब्रह्मासारखी) शांति सुप्रतिष्ठित झाली आहे, त्यांना या शांतींतून विश्वांत काम करणाऱ्या शक्तींचा कधींहि न संपणारा पुरवठा, जिवंत झऱ्यांतून पाणी मिळावें त्याप्रमाणें, सारखा मिळत आहे असें दिसेल.

दि.जी. प्र.४ -- निवड : पुरुषोत्तम. १६ एप्रिल

 

४५. ब्रह्म व त्याचें आवरण

तें अज्ञात ब्रह्म जें जें आवरण क्रमानें घेत घेत लपतछपत खालीं येतें, तें प्रत्येक आवरण ब्रह्मभक्ताला, ब्रह्मशोधकाला क्रमश: उलट क्रमवारीनें ब्रह्मसाक्षात्काराचें साधन बनतें.

दि.जी. प्र.६वें -- निवड : पुरुषोत्तम. १६ एप्रिल

 

४६. अतिमानवतेचा दिव्य मार्ग

जेव्हां प्रेमानें भरलेलें हृदय ज्ञानानें शांत होऊन शांत सुखाचा भोग घेतें आणि सामर्थ्यानें गतिमान् होतें, जेव्हां सामर्थ्याचे बळकट हात ज्ञानाच्या पूर्ण तेजोमय प्रकाशांत व प्रेमाच्या पूर्ण तेजोमय आनंदांत जगासाठीं परिश्रम करतात, जेव्हां ज्ञानाचें तेजोमय मस्तिष्क, हृदयाच्या अस्पष्ट स्फूर्ती सादर स्वीकारून रूपांतरित करतें आणि उच्च स्थानीय दिव्य इच्छाशक्तीच्या कार्याला मदत करण्यास पुढें होतें, जेव्हां सर्व जगाशीं ऐक्यभावानें रहाणाऱ्या सर्व गोष्टी स्वीकारून त्यांचें रूपान्तर करणाऱ्या त्यागी आत्म्यांत हे सर्व देव, म्हणजेच दिव्य शक्ती एकत्र सुप्रतिष्ठित होतात, तेव्हां, त्या स्थितींत मानव सर्व परींनीं, सर्वथा, पूर्णतेनें आत्मातीत होऊं शकतो. अतिमानवतेचा दिव्य मार्ग हा असा आहे. स्वतःला अहंवादाच्या संस्कारांनीं संस्कारित करून गर्वभरानें तिजवर सत्ता गाजवीत, आपल्या सत्ता-बलाच्या आधारावर मानवतेला गुलाम करून झगमगाट दाखवीत रहाणें हा कांहीं अतिमानवतेचा मार्ग नव्हे.

'आर्य'मधील लेख, अतिमानव -- निवड : सत्येन. १८ एप्रिल

पान क्र. ४५


 

४७. ईश्वरभक्ताला सर्वकांहीं मिळतें

भक्त ईश्वराला आपलें जीवन अर्पण करतो, म्हणजे तो जें कांहीं असतो तें सर्व, त्याच्या जवळ जें कांहीं असतें तें सर्व, तो जें कांहीं करतो तें सर्व तो ईश्वराला अर्पण करतो. (यो. स. भक्तिमार्ग)

ईश्वरभक्ताला ईश्वर कांहींच नाकारत नाहीं; सर्वकांहीं भक्ताला मिळूं शकतें, कारण भक्त हा प्रेमी ईश्वराचा आवडता असतो. ईश्वर भक्ताचा प्रियतम व भक्त या प्रियतमाचा आत्मा, असें असल्यानें भक्ताला मिळणार नाहीं असें कांहींच नसतें.

यो.स. भक्तीचें रहस्य -- निवड : नलिनीकांत. १९ एप्रिल

 

४८. त्यागाचें स्वरूप

हा त्याग संसारांतील कर्मांचा त्याग नव्हे, हा त्याग म्हणजे बाह्य संन्यास नव्हे, हा त्याग म्हणजे भोग टाकून देण्याचें दृश्य प्रदर्शन नव्हे, तर प्राणिक वासना टाकणें, अहंकार टाकणें, वासनात्म्याचें आणि अहंशासित मनाचें व राजसिक प्राणिक प्रकृतीचें वैयक्तिक विभक्त जीवन समूळ सोडून देणें. संन्यास म्हणजे सात्त्विक क्रियेंतील त्याग होय. योगाच्या उच्च अवस्थेंत, निर्व्यक्तिक आत्म्याच्या आणि ब्रह्मगत एकतेच्या द्वारां जावयाचें असो, विश्वव्यापक वासुदेवाच्या द्वारां जावयाचें असो किंवा आंतरिक मार्गानें पुरुषोत्तमाच्या द्वारां जावयाचें असो, ही वरील सात्त्विक त्यागाची, संन्यासाची अवस्था अगोदर प्राप्त करून घेणें अगत्याचें आहे.

गी.नि. भा.२ प्र.२४ -- निवड : ललिता. २० एप्रिल

पान क्र. ४६


 

४९. काल व आदर्श वृत्ति

कालाच्या संबंधांत साधकाची आदर्श वृत्ति अशी असावी : त्याच्या ठिकाणीं अमर्याद सहिष्णुता, धीर, धिमेपणा असावा; आपल्यापुढें शाश्वत काळ पडलेला आहे, या काळांत केव्हांतरी आपण सिद्धि गांठूं असा विश्वास साधकाला असावा; या धिमेपणाबरोबरच साधकानें आपली क्रियाशक्ति जोरानें वाढवीत असावें. या क्रियाशक्तीच्या बळावर त्यानें वर्तमानांत शक्य ते विजय मिळवावे; या शक्तीचें प्रभुत्व त्यानें एकसारखें वाढवीत रहावें, तिचा वेगहि वाढवीत रहावें; आपल्या क्रियाशक्तीच्या वाढत्या प्रभुत्वाच्या बळावर तो अशा स्थितीला पोंहचूं शकेल कीं, या स्थितींत त्याच्या अस्तित्वाचें दिव्य सर्वोच्च परिवर्तन तो अद्‌भुत रीतीनें एका क्षणांत घडवून आणूं शकेल.

यो.स. साधनचतुष्टय -- निवड : श्रीमाताजी. २० एप्रिल

 

५०. तुमचीं कर्में विरून जातील

तुमच्या जाणिवेंत कसलीहि खूण वा कसलाहि ठसा मागें न ठेवतां, सागरावर उठणारी लाट जशी सागरांत विलीन होऊन जाते, कमळाच्या पाकळीवरील जलबिंदु जसा ओघळून जातो, त्याप्रमाणें तुमचीं कार्ये विरून जातील.

योग व त्याचे उद्देश -- निवड : पवित्र. २० एप्रिल

 

५१. प्रकृतीच्या खेळाचें कारण

आपल्या प्राकृतिक मनांतील पुन: पुन: येणाऱ्या प्रक्षोभांत एक प्रकारचें सुख सामान्य मानवी आत्म्याला मिळतें; या सुखानुभवार्थ प्रकृतीच्या खेळास त्यानें संमति दिलेली असल्यामुळें प्रकृतीचा खेळ सतत चालूं रहातो.

गी.नि. भा.२ -- निवड : श्रीमाताजी. २१ एप्रिल

पान क्र. ४७


 

५२. अध्यात्म-तत्त्व जीवनांत आणणें

साधकाला एकदां का योगाची इच्छा निर्णयात्मक रीतीनें प्रेरक झाली की मग ती आपली जागा सोडीत नाहीं. त्यानें योगसाधनेला आरंभ केल्यावर ती साधना निःशेष दडपून टाकतां येत नाहीं.

योगमार्गांत सिद्धि प्राप्त करून घेण्याची गुरुकिल्ली ही आहे कीं, जीवनाच्या अनेक साध्यांपैकीं एक कांहींसें महत्त्वाचें साध्य म्हणजे योग, अशी योगाविषयींची वृत्ति असूं नये. सर्व जीवन योगाला वाहिलेले असावें.

हीन अस्तित्वाविषयींची निष्ठा असलेली आमची शक्ति किंवा क्रिया त्या निष्ठेपासून सोडवून उच्चतर अस्तित्वाच्या सेवेंत आम्ही राबवूं शकलों, तर आमच्या योगमार्गांत तेवढेंच पाऊल आम्ही पुढें टाकलें, आम्हांला आमच्या प्रगतीच्या मार्गांत विरोध करणाऱ्या शक्तीचें बळ तेवढेंच आम्हीं कमी केलें असें होईल.

आमच्या प्रकृतींत कांहीं थोडा प्रकाश व तन्मूलक कांहीं थोडा बदल आणणें हें आपलें ध्येय नसून, प्रकृतींत आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणणें हें जर आमचें ध्येय असेल, तर ईश्वरी शक्तीचेंच आवाहन आम्हीं करावयास हवें. व्यक्तीमध्यें हें परिवर्तनाचें अद्‌भुत कार्य ईश्वरी शक्तीच करूं शकते; परिवर्तनार्थ लागणारी निर्णायक, सर्वज्ञ, अमर्याद शक्ति ईश्वरी शक्तीलाच उपलब्ध असते. परंतु, मानवी वैयक्तिक क्रिया बाजूला सारून, तिच्या जागीं ईश्वरी क्रिया पूर्णतया चालूं करणें हें कांहीं एकदम शक्य होत नाहीं. श्रेष्ठ ईश्वरी क्रियेचें सत्य, खालून होणाऱ्या

पान क्र. ४८


 

कनिष्ठ क्रियेच्या लुडबुडीनें असत्यांत ढकललें जातें; अशी ही लुडबुड अगोदर बंद केली पाहिजे, तिचा कांहीं परिणाम होणार नाहीं, इतकी ती निःसत्त्व केली पाहिजे, आणि हें कार्य आम्ही आपल्या इच्छेनें, स्वखुषीनें केलें पाहिजे.

यो.स. आत्मनिवेदन -- निवड : अमृता. २१ एप्रिल

 

५३. प्रकृतींत आध्यात्मिक परिवर्तन हें ध्येय

आमच्या सामान्य अस्तित्वाच्या पलीकडे उंच ठिकाणीं जें कांहीं उच्च तत्त्व आहे त्याची कल्पना, त्याचें बौद्धिक चित्र मनाला कितीहि आकर्षक वाटलें आणि मनानें तें कितीहि बळकट पकडून ठेवलें, तरी एवढें करणें पुरेसें होत नाहीं, परिणामकारक होत नाहीं; हृदयाला हें उच्च तत्त्व एकमेव इष्ट, भोग्य वाटलें पाहिजे. इच्छाशक्तीला हें उच्च तत्त्व मिळविण्यासाठीं परिश्रम करणें हें, एकमेव इष्ट असें कार्य वाटलें पाहिजे. कारण, आध्यात्मिक तत्त्व, सत्य जें असतें त्याचा केवळ विचार करावयाचा नसतो, तर तें जीवनांत आणावयाचें असतें; आणि तें जीवनांत आणावयाचें, तर त्यासाठीं जीवनाच्या सर्व अंगांचें एकचित्त ऐक्य घडून येणें आवश्यक आहे. योगाच्या द्वारां जो महान् बदल अस्तित्वांत घडवून आणण्याचा विचार केला जातो, तो महान् बदल, इच्छा विभागली गेली असेल, एकनिष्ठ नसेल तर घडून येणें शक्य नाहीं; आमच्या शक्तींचा कांहीं थोडा भाग खर्चीं टाकून तो बदल घडवून आणणें शक्य नाहीं. आमचें मन संशयग्रस्त असेल, मागें-पुढें करीत असेल, तर तो बदल घडून येणें शक्य नाहीं. ज्याला ईश्वर हवा आहे, त्यानें ईश्वराच्या पायीं, केवळ ईश्वराच्याच पायीं आत्मसमर्पण करणें आवश्यक आहे.

यो.स. आत्मनिवेदन -- निवड : चंपकलाल. २१ एप्रिल

पान क्र. ४९


 

५४. अशा स्थानीं आत्मज्ञान लाभतें

आत्मज्ञान मिळावें यासाठीं वासना, आसक्ति, अस्वस्थ भावना आणि एकंदर अशांत, विकृत मानसिक वातावरण, जें आत्म्याच्या पंखांना अडचण करून त्याच्या ऊर्ध्व गतीस आड येत आहे तें, दूर झटकून टाकून निर्विकार समृद्धीच्या नभांत, निर्व्यक्तिक शांतीच्या स्वर्गांत, अहंशून्य दृष्टीनें वस्तुजाताचें भान आणि दर्शन जेथें शक्य आहे अशा उच्च स्थानीं आपण जायला हवें. आत्मज्ञानलाभाच्या मार्गांतील हें पहिलें स्थान समजावें. या स्थानीं शांततेचें निर्मळ, उच्च वातावरण असतें, विकारादिकांचें वादळ, ढग इ. विघ्नांपासून हें स्थान दूर असतें. अशा स्थानीं आत्मज्ञान लाभूं शकतें, आणि विश्वाचा नियम आणि प्रकृतीचें सत्य अशा स्थानीं स्थिर, व्यापक नजरेनें, सर्वसंग्राहक सर्वान्त:स्पर्शी सुस्थिर प्रकाशांत न्याहाळतां येतें.

गी.नि. भा.२ प्र.१३ -- निवड : नलिनीकांत. २३ एप्रिल

 

५५. मुक्त मानव कसा असतो ?

मुक्त मानवाला स्वतःच्या वैयक्तिक आशाअपेक्षा नसतात. तो स्वतःची मत्ता म्हणून कोणत्याहि वस्तु हस्तगत करीत नाहीं; ईश्वरी इच्छा त्याला जें देईल तें घेऊन तो समाधानांत असतो, कसलीहि हांव धरीत नाहीं, तो कोणाचाहि मत्सर करीत नाहीं, जें त्याला मिळेल तें तो घेतो; तें घृणास्पद असलें, तरी त्याची तो घृणा करीत नाहीं. तें आकर्षक असलें, तरी त्याविषयीं आसक्ति धरीत नाहीं. जें त्याजपासून जातें, त्याला तो जाऊं देतो, वस्तुजाताच्या नित्य फिरणाऱ्या भोंवऱ्यांत जाऊं देतो; त्याबद्दल हळहळ करीत नाहीं, दुःख करीत नाहीं, तें गेल्यानें आपली हानि झाली अशी भावना त्याचें चित्त धरीत नाहीं; त्याचें हृदय, त्याचें चित्त त्याच्या पूर्णपणें स्वाधीन असतें; भलताच विकार, प्रतिक्रिया त्याच्या

पान क्र. ५०


 

ठिकाणीं उत्पन्न होत नाहीं. बाह्य स्पर्श झाला की क्षोभाची प्रतिक्रिया त्याच्या ठिकाणीं उत्पन्न झाली असें कधीं होत नाहीं.

गी.नि. भा.१ प्र.१८ -- निवड : नलिनीकांत. २३ एप्रिल

 

५६. हा मार्ग सोपा व खात्रीचा आहे

आपलें हें साध्य साधण्यासाठीं आपल्याला पुढील मार्गानें जावें लागेल : आपलें सर्व जाणीवयुक्त अस्तित्व ईश्वराशीं संपर्क साधील, त्याच्याशीं नातें जुळवील असें आम्हीं केलें पाहिजे; ईश्वराला आम्हीं हांक दिली पाहिजे आणि आळविलें पाहिजे कीं त्यानें आमचें सर्व अस्तित्व रूपांतरित करावें व आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचें रूप त्याला द्यावें. हा मार्ग कल्पनातीत अवघड असला, तरीहि या मार्गाचे परिश्रम आणि त्याचें अंतिम प्राप्तव्य यांची तुलना केली असतां, हा मार्ग अतिशय सोपा आणि अतिशय खात्रीचा आहे.

यो.स. प्रास्ताविक -- निवड : अमृता. २३ एप्रिल

 

५७. भक्तियोगांतील ध्यानाची विशेषता

प्रमुख गोष्ट हीच एक आहे कीं, मनांतील विचार पूजाविषयाकडे तीव्र भक्तीनें लागले पाहिजेत.... भक्तियोगांतील ध्यान हें शांतीचें ध्यान नसतें, तें हर्षमय ध्यान असतें. ईश्वराच्या अस्तित्वांत विलीन होण्यासाठीं तें नसतें, तर ईश्वराला आपल्या अंगांगांत आणण्यासाठीं असतें. अंतरंगांतील त्याच्या उपस्थितीच्या आनंदात स्वतःला विसरण्यासाठीं तें असतें; ईश्वराला हृदयांत आणून आपल्या स्वाधीन करून घेतल्याच्या आनंदांत स्वतःला विसरण्यासाठीं तें असतें; हा भक्तीचा आनंद म्हणजे ज्ञानमार्गांतील एकतामूलक शांति नसते, तर ईश्वराच्या समागमानें झालेला हर्ष तो असतो.

 

पान क्र. ५१


 

हा आनंद, हें सुख ईश्वरभेटीचें ईश्वरी सुख असतें. हें सुख मानवी बुद्धीला आकलन होण्याजोगें नसतें.

यो.स. भक्तिमार्ग -- निवड : अमृता. २५ एप्रिल

 

५८. सर्वांगपूर्ण आत्मदान हवें

तुम्ही जेव्हां आत्मदान करतां तेव्हां ते सर्वांगपूर्ण निःशेषतया केलेलें असावें. कोणतीहि मागणी, अट किंवा संकोच त्यांत नसावा. त्यायोगें तुमच्यांतील सर्वकांहीं भगवती मातेच्या मालकीचें होईल व तुमच्या अहंकारासाठीं किंवा दुसऱ्या कोणत्याहि शक्तीसाठीं कांहीं सुद्धां उरणार नाहीं.

'माता' -- निवड : अमल किरण. २६ एप्रिल

 

५९. शुद्धीकरण सर्वांगीण हवें

हृदय शुद्ध केलें नसेल, इन्द्रियवृत्ति शुद्ध केली नसेल, प्राणशक्ति शुद्ध केली नसेल, तर हीं मलिन अशुद्ध अंगें बुद्धीला गोंधळांत ढकलतात, बुद्धीच्या गृहीत गोष्टींत, पुराव्यांत गडबड करतात, बुद्धीच्या निर्णयांत विकृती उत्पन्न करतात, बुद्धीची दृष्टि कमी-अधिक आंधळी करतात; बुद्धीनें मिळविलेल्या ज्ञानाचा गैर उपयोग करतात. शरीर अशुद्धीकृत असेल, तर बुद्धीच्या कार्यांत अडथळा येतो, तें बंद पडण्याचा धोका असतो. तेव्हां शुद्धीकरण करावयाचें तें सर्वांगीण करावयास हवें. तें सर्वांगीण करणें आवश्यक असतें....

उदाहरणार्थ प्रेम घ्या. प्रेम, भक्ति ही हृदय शुद्ध करणारी भावना आहे; आमच्या सर्व भावनांना दिव्य ईश्वरी प्रेमाचें रूप देऊन हृदयाला

पान क्र. ५२


 

प्रेम, भक्ति पूर्णता आणते आणि त्याची परिपूर्ति करते; तथापि दिव्य ईश्वरी ज्ञानाच्या सहाय्यानें हें प्रेम प्रथम शुद्ध करावें लागतें....

याप्रमाणें शुद्धीकरण केलें गेलें म्हणजे प्राणिक नाडीमय अस्तित्व आणि हृदय या अंगांत पूर्ण समत्व प्रस्थापित होतें; याप्रमाणें समत्व ही कर्ममार्गांत जशी अव्वल, प्रथम-घोषणा होती, तशी समत्व ही ज्ञानमार्गांतहि प्रथम-घोषणा ठरते. 'समत्व' हें कर्ममार्गाप्रमाणेंच ज्ञानमार्गांतहि यशप्राप्तीचें 'पहिलें सूत्र' आहे....

आध्यात्मिक ज्ञानाचा आरंभ ऐन्द्रिय जीवनाच्या मर्यादांस नकार देऊन होतो; तसेंच, दृश्य, इंद्रियग्राह्य घटना किंवा वस्तु सत्याचें केवळ रूपात्मक स्वरूप नसून, अधिक कांहीं आहे या समजुतीला मान्यता देऊन आध्यात्मिक ज्ञानाचा आरंभ होतो.

यो.स. शुद्ध बुद्धि -- निवड : अमृता. २६ एप्रिल

 

६०. ईश्वरी प्रसादाची अनुभूति

हा ईश्वरी प्रसाद कांहीं केवळ रहस्यमय अवतरणाच्या, स्पर्शाच्या स्वरूपाचा नसतो; हा प्रसाद ईश्वराच्या सर्वव्यापी आंतरिक क्रियेच्या स्वरूपाचा असतो; आमच्या अंतरंगांत ही क्रिया आम्हांला जाणवते. -- आमचा उच्चतम आत्मा, आमच्या अस्तित्वाचा प्रभु आमच्या आत्म्यांत आपल्या शक्तीच्या रूपानें प्रवेश करीत आहे, आणि आमचा आत्मा ताब्यांत घेत आहे असा अनुभव आम्हांला येतो; तो अगदीं आमच्या जवळ आहे, आमच्या मर्त्य प्रकृतीवर प्रभाव पाडीत आहे ही अनुभूति आम्हांला येते; इतकेंच नव्हे, तर या ईश्वरी कायद्यानुसार आम्ही जीवन जगूं लागतों, तो कायदा आमच्या ज्ञानशक्तीला कळतो व आमची प्रकृति आध्यात्मिकतेनें संपन्न होऊन केवळ या शक्तीनेंच सर्व कार्य करूं लागते.

यो.स. पूर्ण पूर्णत्व -- निवड : नलिनबिहारी. २७ एप्रिल

पान क्र. ५३


 

६१. ईश्वराशीं एकरूप होण्यासाठीं

ईश्वराशीं, दिव्य तत्त्वाशीं एकरूप होण्याची योग्यता आम्हांला येण्यासाठीं आमचें अहंवादी हेतू आमच्या कनिष्ठ प्रकृतीचे मोह, आमच्या दौर्बल्याचे आधार आम्हीं दूर फेंकून देणें आवश्यक आहे.

यो.स. भक्तीचे हेतू -- निवड : चंपकलाल. २८ एप्रिल

 

६२. तर्क नको, अनुभव हवा

विविध दृष्टिकोनांबाबत वाद घालीत बसण्यांत अर्थ नाहीं. ईश्वराचें दर्शन होईपर्यंत तुम्ही थांबा; स्वतःस आणि ईश्वरास जाणलेत म्हणजे वाद आणि चर्चा यांची आवश्यकताच उरणार नाहीं.

आपल्यासमोर जें अंतिम उद्दिष्ट म्हणून ठेवलें गेलें आहे तें, अशा विषयासंबंधी तर्क नि कल्पना करतां येणें हें नाहीं, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणें हे आहे. स्वतःला ईश्वरी रूपांत साकार करून घेणें, ईश्वराच्या ठिकाणींच आपलें वास्तव्य सिद्ध करून घेणें, ईश्वरासमवेत रहाणें, ईश्वरी आनंद, सामर्थ्य यांचें वाहक बनणें, आणि ईश्वराच्या कार्यार्थ साधन बनणें यासाठीं आपल्याला आवाहन आहे.

योग व त्याचे उद्देश -- निवड : दत्ता. २ मे

 

६३. अनिर्वाच्य ब्रह्माचें स्वरूप

मन आणि वाणी यांना वर्णन करतां येणार नाहीं किंवा कल्पना करतां येणार नाहीं असा परात्पर आनंद हें अनिर्वाच्य ब्रह्माचें स्वरूप आहे. अखिल विश्वांत आणि विश्वांतील प्रत्येक वस्तूंत तेंच अनिर्वाच्य ब्रह्म चिंतनमग्न असतें.... आणि तो आध्यात्मिक आनंद येथें आपल्या हृदयामध्येंसुद्धां असतो.

-- निवड : दत्ता. २ मे

पान क्र. ५४


 

६४. योगाचा खरा आशय

जें असामान्य आहे तें सामान्य बनविणे आणि जें आपल्या उर्ध्वस्थित आहे आणि सामान्य जाणिवेपेक्षां जें मोठें आहे, त्याला आपली नित्याची नित्य-निरंतर जाणीव बनविणें हा योगाचा अगदीं नेमका खरा आशय आहे.

यो.स. -- निवड : दत्ता. २ मे

 

६५. स्वयंसिद्ध आनंद

हा जो पूर्णत: अनिवार्य आनंद असतो तो भगवत्-आनंद असतो, तो केवळ त्याच्या स्वतःसाठीं असतो, दुसऱ्या कशासाठींहि नाहीं. स्वतःखेरीज कोणत्याहि बाह्य कारणासाठीं किंवा लाभासाठीं तो नसतो. ईश्वर आपल्याला कांहीं देईल यासाठीं किंवा त्याच्या ठिकाणच्या एकाद्या विशिष्ट गुणासाठीं तो प्रयत्न करीत नाहीं, तर भगवंत हा आपला अंतर्यामी आहे, आपले अखिल अस्तित्व आहे आणि आपलें सारसर्वस्व आहे याकरतांच केवळ, याच शुद्ध हेतूनें केवळ तो भगवंताचा शोध घेतो.

यो.स. -- निवड : दत्ता. २ मे

पान क्र. ५५